२०२३च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेक कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत होता. 'ॲनिमल'मधील रणबीर आणि बॉबी देओलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. तर या सिनेमातील हिंसा, सीन्स आणि काही संवादांमुळे सिनेमा ट्रोलिंगच्या भोवऱ्या अडकला होता. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाबाबत त्यांचं मत मांडलं होतं. आता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने 'ॲनिमल'बाबत भाष्य केलं आहे.
करणने 'ॲनिमल'ला २०२३मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटलं आहे. करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना 'ॲनिमल' सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसंच हा सिनेमा पाहताना रडू आल्याचा खुलासाही करणने मुलाखतीत केला. तो म्हणाला, "मला वाटतं 'ॲनिमल' हा २०२३मधील सगळ्यात चांगला चित्रपट आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मला थोडा वेळ लागला. कारण, जेव्हा तुम्ही चार लोकांमध्ये तुमचं मत मांडता. तेव्हा थोडी भीती असते. मला कबीर सिंगही आवडला होता."
'ॲनिमल' सिनेमाचं कौतुक करत पुढे तो म्हणाला, "'ॲनिमल' मला सिनेमाची कथा, सिनेमाबाबत असलेला तुमचा समज मोडीत काढणे यासाठी आवडला. अचानक सिनेमात हिरोलाच मारत असल्याचं दिसतं आणि त्यावेळी आजूबाजूचे लोक गाणं गाताना दिसतात. याआधी मी असा सीक्वेन्स पाहिलेला नाही. शेवटी दोघं जण एकमेकांच्या जीवावर उठलेले असताना सिनेमात गाणं सुरू असतं. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते," असंही पुढे करण म्हणाला.
"मी दोन वेळा 'ॲनिमल' चित्रपट पाहिला. पहिल्यांदा एक प्रेक्षक म्हणून तर दुसऱ्यांदा अभ्यास करण्याच्या दृष्टीने मी 'ॲनिमल' पाहिला. सामान्य विचार असलेल्या व्यक्तीचं हे डोकं नाही. वेगळा विचार करणारा व्यक्तीच असा चित्रपट बनवू शकतो," असंही पुढे करण म्हणाला.