अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला गुरुवारी समन्स बजावले होते. २०१९ मध्ये त्याच्या घरी झालेल्या कथित ड्रग्स पार्टीबद्दल त्याच्याकडे विचारणा करण्यात आली होती. या संबंधित करणला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान करणने सांगितले आहे की, माझ्या पार्टीत कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन केलं गेलं नव्हतं.
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी करण जोहरचे नाव पहिल्यापासून चर्चेत राहिले आहे. करणने गेल्यावर्षी त्याच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा यांसारखे कलाकार उपस्थित होते. या पार्टीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हे फोटो, व्हिडिओ पाहून या पार्टीत ड्रग्सचे सेवन करण्यात आले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसेच शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी करण जाेहरच्या घरात झालेल्या पार्टीची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करून या पार्टीच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र करण जोहरने सर्व आरोप फेटाळले होते. तसेच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील दिला होता.