करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पद्मावती’च्या पोस्टरची केली होळी, निर्मात्यांना दिली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 12:15 PM
संजय लीला भन्साळी यांचा आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट म्हणावा तसा सहजासहजी रिलीज होणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच जयपूर येथील चित्रपटाच्या ...
संजय लीला भन्साळी यांचा आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट म्हणावा तसा सहजासहजी रिलीज होणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच जयपूर येथील चित्रपटाच्या सेट्सची तोडफोड केली होती, तसेच इतिहासच बदलून सांगितला जात असल्याचा आरोप करीत निर्मात्यांच्या श्रीमुखातही भडकावली होती. आता पुन्हा एकदा या चित्रपटावरून राडा करण्यात आला असून, यावेळेस चित्रपटाच्या आउटफिटवर हल्ला करण्यात आला आहे. होय, श्री राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पद्मावती’च्या पोस्टर्स जाळून टाकले आहेत. तसेच हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याची धमकीही दिली आहे. समाचार एजन्सी आयएनएसशी बोलताना श्री राजपूत करणी सेनेचे जयपूर जिल्हा अध्यक्ष नारायण सिंह दिवराले यांनी सांगितले की, ‘जयपूरला शूटिंग करीत असताना संजय भन्साळी यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की, ‘रिलीज अगोदर ते आम्हाला आणि काही इतिहासकारांना चित्रपट दाखविणार आहेत. मात्र तेव्हापासून कोणीही आम्हाला संपर्क केला नाही, शिवाय आम्हाला चित्रपटही दाखविला नाही. त्यामुळेच आम्ही हा चित्रपट तोपर्यंत रिलीज होऊ देणार नाही, जोपर्यंत चित्रपटाला संघटनेतील सदस्य आणि इतिहासकारांकडून स्वीकृती मिळत नाही.’ या अगोदर राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह काल्वी यांनी आयएएनएसशी बोलताना म्हटले होते की, ‘जवळपास २० दिवसांपूर्वी भन्साळीच्या टीममधील कोणीतरी फोन करून आम्हाला चित्रपट दाखविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही हा चित्रपट इतिहासकार आणि बुद्धिजीवी लोकांना दाखविण्यास सांगितले होते. त्यानंतर मात्र आमची कुठलीही चर्चा झाली नाही.’ लोकेंद्र सिंह यांचे वक्तव्य चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर पुढे आले. दरम्यान, चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने चितौडची राणी पद्मावती यांची भूमिका साकारली आहे. तर रणवीर सिंग याने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पद्मावती’च्या टीमला चोप दिला होता. शिवाय संपूर्ण सेटची तोडफोड केली होती. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की, निर्माता या चित्रपटातून इतिहास विकृतपणे मांडणार आहे. आता पुन्हा एकदा हा वाद उफाळून आल्याने चित्रपट सहजासहजी रिलीज होणार काय? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भन्साळी हे पुन्हा एकदा करणी सेनेच्या पदाधिकाºयांशी संवाद साधून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतील काय? हे बघणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.