करिना कपूर लवकर आमिर खानसोबत 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा प्रदर्शित होत नाही तोवर तिच्या नवीन सिनेमाचीही चर्चा सुरु झाली आहे. करिना 'सीता' सिनेमात मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. निर्मात्यांनी करिनाला या सिनेमाची ऑफर देताच lतिने देखील मानधनाचा आकडा सांगितला.
बॉलिवूड निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अलौकिक देसाई यांनी सिनेमासाठी करिनाची भेट घेतली होती. करिना एका सिनेमासाठी ६ ते ८ कोटी इतके मानधन घेते. मात्र 'सीता' सिनेमासाठी तिने दुप्पट मानधन मागितले आहे. या सिनेमासाठी करिनाला १० ते १२ महिने काम करावं लागणार आहे.
तिचा संपूर्ण वेळ तिला याच सिनेमासाठी द्यावा लागणार आहे. करिनाने मागितलेल्या माधनामुळे सध्या निर्मातेही यावर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ मानधनामुळे करिना व्यतिरिक्त दुस-याही अभिनेत्रीचा विचार केला जाण्याचीही शक्यता आहे.
अनेकदा करिना बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना मिळणा-या मानधनाविषयी आपले विचार मांडताना दिसते. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तिने याच मुद्द्यावर मत मांडताना सांगितले होते की, माझ्या मते प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळत आहे. अनुष्का असो किंवा दीपिका किंवा अन्य कुणी अभिनेत्री प्रत्येकीला त्यांच्या त्यांच्या क्षमता आणि योग्यतेनुसार मानधन मिळतं. त्यात अनेकजण लेखक आणि निर्माते बनत आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलत आहे.
प्रत्येकजण मानधनाच्या बाबतीत समानता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अभिनेत्री मानधनात न्याय मिळावा यासाठी आवाजही उठवत आहेत. याबाबत सवाल जवाब होत आहेत ही गोष्ट चांगलीच असल्याचे तिने म्हटले होते.
जीवनात जोखीम पत्करणं करिनाला आवडते असे तिने म्हटले होते. यावर तिने म्हटले होते की, लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही. त्यानंतर लोक बोलू लागले की मुलं झाल्यावर तर बिल्कुलच काम मिळणार नाही.
मात्र माझ्याबाबतीत उलट घडत आहे. आजघडीला मी चित्रपट नाकारत आहे. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि मुलांना वेळ द्यायचा आहे. चित्रपट नाकारत असले तरी माझ्याकडे आज बरेच चित्रपट आहेत. ज्या गोष्टी आजवर घडत होत्या त्या मी कायम बदलत राहिले.