करिना कपूर आपल्या अटींवर जगणारी अभिनेत्री आहे. मग करिअर असो वा खासगी आयुष्य. करिना नेहमीच आपल्या अटींवर जगत आली. तिच्या मार्गात येणा-यांनाही तिने धुडकावून लावले. अर्थात या प्रयत्नांत अनेकदा ती वादात सापडली. पण करिनाने या वादांची कधीच पर्वा केली नाही.21 सप्टेंबर 1980 रोजी जन्मलेल्या करिनाचा आज वाढदिवस. आज तिच्याशी आयुष्यातील अशाच काही वादांबद्दल....
करिअर सुरु होण्याच्या आधीच करिना कपूर वादात सापडली होती. होय, राकेश रोशन यांचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट तिने साईन केला. पण ऐनवेळी त्यात काम करण्यास नकार दिला. करिनाने ऐनवेळी हा चित्रपट सोडल्याने राकेश रोशन कमालीचे नाराज झाले होते. ‘कहो ना प्यार है’ सोडून करिनाने जे. पी. दत्ता यांचा ‘रिफ्युजी’ साईन केला. पुढे ‘कहो ना प्यार है’ सुपरहिट झाला आणि ‘रिफ्युजी’ फ्लॉप. पण याने करिनाला काहीही फरक पडला नाही. पहिला चित्रपट फ्लॉप होऊनही करिनाला घ्यायला अनेक दिग्दर्शक-निर्माते उत्सुक होते. पण करिना हवेत होती. असे म्हणतात की, कपूर कुटुंबाच्या जवळ असलेल्या मेकर्सचेच चित्रपट करिना साईन करत होती. यामुळे तिने अनेकांची नाराजी ओढवून घेतली. यात यश चोप्रा आणि करण जोहर यांचाही समावेश होता. पण करिनाने कुणालाही जुमानले नाही.
‘अजनबी’ या चित्रपटाच्या सेटवर तापट स्वभावाच्या करिनाने बिपाशा बासूच्या थोबाडीत मारली होती. 2001 मध्ये करिना आणि बिपाशाने ‘अजनबी’ मध्ये एकत्र काम केले होते. अब्बास-मस्तान दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवर करिना आणि बिपाशाचे भांडण झाले होते. असे म्हणतात की, बिपाशाने करिनाच्या परवानगीशिवाय तिच्या डिझायनरची मदत घेतली होती. या गोष्टीमुळे नाराज झालेली करिना बिपाशावर इतकी भडकली होती की, रागाच्या भरात तिने बिपाशाच्या थोबाडीत मारली होती.
2006 मध्ये एका मॅगझिनने करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचा एक लिपलॉक फोटो आपल्या पहिल्या पानावर छापला होता. त्यावेळी करिना शाहिदला डेट करत होती. हा फोटो समोर येताच करिना जाम भडकली होती आणि त्या मॅगझिनला कोर्टात खेचले होते. याचवर्षी करिनाचा एक एमएमएस इंटरनेटवर लीक झाला होता.
करिना कपूर गर्विष्ठ स्वभावासाठी बदनाम आहे. अनेक को-स्टार्स तिच्या या स्वभावाचे बळी ठरले. बिपाशासोबतच्या भांडणामुळे बिपाशाचा बॉयफ्रेन्ड जॉन अब्राहम करिनाच्या हिट लिस्टवर होता. एका मुलाखतीत तिने जॉनच्या अॅक्टिंगची नक्कल करत त्याची टिंगल उडवली होती. यामुळे नाराज झालेल्या जॉनने यानंतर कधीच करिनासोबत काम केले नाही.
शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिना सैफ अली खानच्या प्रेमात पडली. हे रिलेशन समोर आले आणि जणू खळबळ माजली. कपूर कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. करिनापेक्षा वयाने खूप मोठा आणि घटस्फोटीत सैफसोबतचे तिचे नाते कुणीच स्वीकारायला तयार नव्हते. करिना काहीच दिवसांत या नात्यातून बाहेर पडेल, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण 2012 मध्ये करिनाने सैफशी लग्न करून सगळ्यांना आणखी मोठा धक्का दिला.