सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खानचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणाऱ्या या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा करिना अथवा सैफ करत नाहीत. पण आता तैमुरच या प्रसिद्धीला आणि त्याच्या मागे सतत फिरणाऱ्या फोटोग्राफर्सना कंटाळला आहे.
तैमुरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो प्रचंड चिडलेला दिसत असून फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या फोटोग्राफर्सना परवानगी नाहीये असे सुनावताना दिसत आहे. तैमुरचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओत आपल्याला करिना आणि तैमुर हे दोघे एका हॉटेलच्या आत जाताना दिसत आहे. तैमुर आणि करिनाला पाहाताच तिथे उपस्थित असलेले फोटोग्राफर्स त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचवेळी तैमुर मागे वळून Not Allowed (परवानगी नाहीये) असे ओरडताना दिसत आहे. त्यावर करिना त्याचा हात पकडून त्याला आत घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तैमुर प्रचंड चिडलेला असल्याने तिचे देखील ऐकत नाहीये. तो पुन्हा एकदा Not Allowed असे बोलताना दिसत आहे.
करिना कपूर आणि सैफ अली खानचा लेक तैमुर अली खान माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या जन्मापासूनच बॉलिवुड आणि मीडियामध्ये त्याची चर्चा असते. तैमुरची कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. पण तैमुर आता या सगळ्या गोष्टींना कंटाळला असल्याचेच या व्हिडिओद्वारे दिसून येत आहे.