Join us

लोलोच्या दिलखेचक अदा! ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर थिरकली करिश्मा कपूर; व्हिडिओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:44 IST

तोच उत्साह आणि तशीच धमाल! करिश्मा कपूरला नाचताना पाहून नेटकरी झाले फिदा; म्हणाले....

बॉलिवूडच्या कपूर खानदानाची लाडकी लेक अर्थात अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करिश्माने तिच्या ‘दिल ले गई ले गई’ या गाण्यावर ठेका धरला. या गाण्यावर तिच्या मूव्ह्स पाहून सगळेच थक्क झाले आहेत. करिश्मा कपूरचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचा डान्स पाहून चाहत्यांना नव्वदच्या दशकांतील लोलोची आठवण झाली आहे. 

अभिनेत्री करिश्मा कपूर एफआयसीसीआयच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने ‘दिल ले गई ले गई’ गाण्यावर ठेका धरला. अभिनेत्रीला नाचताना पाहून उपस्थित सगळेच थक्क झाले होते. करिश्माच्या अदा पाहून सगळ्यांनाच ९०च्या दशकांत गेल्यासारखे वाटले. करिश्मा कपूरच्या या गाण्यानेच नव्हे तर, ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाने देखील एक काळ गाजवला होता. लोलोला पुन्हा एकदा त्याच अवतारात पाहून तिचे चाहते चांगलेच खूश झाले. 

अदा पाहून नेटकरी फिदा!

करिश्मा कपूरचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, ‘ही आजही हिऱ्यासारखी चमकते’. ‘काय सुंदर अदा आहेत’, ‘हि तर आजही त्याच वयाची दिसते’, ‘खूप सुंदर करिश्मा, अनेक वर्षे उलटूनही तुझा जलवा कायम आहे’, अशा अनेक कमेंट्स देखील तिच्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

करिश्माने गाजवलेला मोठा पडदा!

करिश्मा कपूर हिने आपल्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्याने नव्वदचे दशक चांगलेच गाजवले होते. १९९७मध्ये तिचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करिश्मा कपूरसोबत माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकले होते. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार तर, ७ फिल्मफेअर आणि काही मोठे पुरस्कार पटकावले होते. कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच करिश्माने अभिनयातून विश्राम घेऊन संसार थाटला होता. लग्नानंतर करिश्मा मनोरंजन विश्वापासून दुरावली होती. परंतु, तिच्या वैवाहिक आयुष्यात काही वादळे आली आणि त्यांनी तिचा संसार उद्ध्वस्त केला. एका मोठ्या ब्रेकनंतर करिश्माने पुन्हा एकदा पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला. ती गतवर्षी ‘मर्डर मुबारक’मध्ये झळकली होती.

टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटी