Shehzada, Kartik Aaryan : शाहरूखच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉलिवूडला मोठा दिलासा दिला. बॉलिवूडच्या सिनेमांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले असतानाचा ‘पठाण’ने देशात सुमारे ५०० कोटींचा बिझनेस केला. आता बॉलिवूडच्या नजरा कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’वर आहेत. क्रिती सॅनन व कार्तिकचा हा सिनेमा येत्या १७ तारखेला चित्रपटगृहांत धडकणार आहे. गेल्या ११ फेब्रुवारीपासून सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. व्हॅलेन्टाईन डे निमित्त मेकर्सनी ‘शहजादा’च्या तिकिटावर मोठी ऑफरही दिली आहे. आज १४ फेब्रुवारीला तिकिट बुक करणाऱ्यास एका तिकिटावर एक तिकिट फ्री मिळणार आहे. साहजिकच सिनेमाच्या ओपनिंग बिझनेसवर याचा थेट परिणाम होणार आहे.तूर्तास ‘शहजादा’च्या ॲडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
रिलीजआधीच कमावले इतके कोटी‘शहजादा’चा बजेट ८५ कोटी असल्याचं कळतंय. यापैकी प्रॉडक्शनवर ६५ कोटींचा तर प्रमोशनवर २० कोटींचा खर्च झाला आहे. यापैकी ६५ कोटी सिनेमाने रिलीजआधीच वसूल केले आहे. चित्रपटाचे म्युझिक राईट्स १० कोटी रूपयांत विकले गेले आहे. १५ कोटींमध्ये सॅटेलाइट राईट्स विकले गेले आहे. तर ओटीटी रिलीजसाठी नेटफ्लिक्ससोबत ४० कोटी रूपयांची डील झाली आहे. म्हणजेच, रिलीजआधीच सिनेमाने ६५ कोटी वसूल केले आहेत. आता तिकिटबारीवर हा सिनेमा किती कमाई करतो, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.‘शहजादा’ हा सिनेमा ‘अला वैकुंठपुरमलो’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.अल्लू अर्जून याची मुख्य भूमिका असलेला ‘अला वैकुंठपुरमलो’ हा तेलुगू चित्रपट २०२० च्या जानेवारीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता.
अभिनेता वरुण धवनचा भाऊ रोहितने ‘शहजादा’ दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट आधी १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र ‘पठाण’ चित्रपटाची हवा बघून निर्मात्यांनी ‘शहजादा’चे प्रदर्शन १७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता सोमवारपासूनच या चित्रपटाच्या आगाऊ तिकीटविक्रीला सुरुवात झाली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगाऊ तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रदर्शनपूर्व ८ कोटींची कमाई करेल, असे निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.