सध्या कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'चंदू चँपियन' सिनेमासाठी कार्तिक आर्यनने जबरदस्त मेहनत घेतलेली दिसतेय. कालच 'चंदू चँपियन'चं पहिलं पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरमध्ये लंगोटवर कार्तिक जीव तोडून पळालेला दिसला. अशातच 'चंदू चँपियन' सिनेमात कार्तिकची भूमिका असलेलं दुसरं पोस्टर रिलीज झालंय. हे पोस्टर पाहून कार्तिकने या सिनेमासाठी स्वतःच्या फिटनेसवर किती काम केलंय, हे दिसून येईल.
चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये कार्तिकच्या कपाळावर जखमा आणि हातात बॉक्सिंग ग्लोव्हज घातलेला दिसत आहे. असं दिसतंय की कार्तिक बॉक्सिंग रिंगमध्ये आहे. हे पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "आयुष्याच्या रिंगमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहावे लागेल." चॅम्पियन येत आहे... अशाप्रकारे कार्तिक आर्यनने 'चंदू चँपियन' साठी घेतलेली मेहनत दिसून येतेय.
कबीर खान 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमासाठी कार्तिकने 14 महिने मराठीतील संवादही शिकले. एका भाषा प्रशिक्षकाच्या मदतीने कार्तिक मराठी शिकला. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या सिनेमाचा पहिला टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.