‘भूलभुलैया २’ या चित्रपटानंतर अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) बी टाऊनचा पुढचा सुपरस्टार म्हटलं जाऊ लागलं होतं. त्याच्या ‘शहजादा’(Shehzada) या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. पण ‘शहजादा’ रिलीज झाला आणि या सिनेमानं चाहत्यांची निराशा केली. कार्तिकचा हा सिनेमा प्रेक्षकांना फार काही भावला नसल्याचं चित्र आहे. कार्तिकच्या आधीच्या चित्रपटाच्या मानाने त्याचा ‘शहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात अपयशी ठरला आहे. दुसऱ्या दिवशीही हा सिनेमा फार काही खास कमाई करू शकला नाही.‘शहजादा’ हिट करण्यासाठी मेकर्सने नवा फंडा शोधला होता. पहिल्या दिवशी एकावर एक तिकिट फ्रीची ऑफर होती. मात्र याऊपरही सिनेमा गर्दी खेचू शकला नाही. रिलीजच्या दिवशी पहिल्या शुक्रवारी या सिनेमाने फक्त ६ कोटींचा बिझनेस केला.
पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट काही खास कमाई करू शकलेला नाही. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतात ७ ते ९ कोटीच्या आसपास कमाई केली आहे.पहिल्या दिवशी एकावर एक तिकीट मोफत असल्याने लोकांनी हा सिनेमा पाहिला, पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती कायम दिसली.
दरम्यान आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुण्ठपुरामुलू’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सनॉनसह राजपाल यादव, परेश रावलसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.एकीकडे चित्रपटगृहांत ‘शहजादा’ रिलीज झाला आहे. दुसरीकडे हॉलिवूडचा ‘एंट मॅन द वास्प क्वांटमेनिया’ही रिलीज झाला आहे. धनुषचा साऊथ सिनेमा ‘वाथी’ सुद्धा चित्रपटगृहांत आहे. शाहरूख खानचा ‘पठाण’ ही अद्याप टिकून आहे.