कोणत्याही गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). सध्या कार्तिक त्याच्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. येत्या १४ जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कार्तिक या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अलिकडेच त्याने एका कार्यक्रमात दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि 'दोस्ताना 2' या सिनेमातून बाहेरचा पडण्याच्या निर्णयाविषयी भाष्य केलं.
कार्तिकने 'द लल्लनटॉप'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने 'दोस्ताना 2' हा सिनेमा सोडण्याविषयी भाष्य केलं. "आता मुळात ती गोष्टच जुनी झाली आहे. बऱ्याचदा मिस कॉम्युनिकेशन होतं ज्यामुळे गोष्टी हाताबाहेर जातात. आणि, अशा काही गोष्टी लिहिल्या जातात ज्यामुळे त्यातून वेगळा अर्थ निघतो. कोणत्याही गोष्टीला वाढवून सांगितलं जातं", असं कार्तिक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "या सगळ्या गोष्टींवर मी तेव्हाही मौन बाळगलं होतं आणि आताही शांतच आहे. मी फक्त १०० टक्के काम करतो. पण, ज्यावेळी अशा काही गोष्टी कानावर येतात त्यावेळी मी शांत बसून घेतो. मी त्या गोष्टींकडे जास्त लक्षही देत नाही आणि काही सिद्ध करायचा प्रयत्न सुद्धा करत नाही."
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, कार्तिक आणि करण यांच्यातील वाद मिटला आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2023 मध्ये करण जोहरने कार्तिक आणि त्याच्या सिनेमाचं कौतुक केलं होतं.