Join us

धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:20 PM

Ghatkopar Hoarding Collapsed : कार्तिक आर्यनच्या मामा-मामीने घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत गमावला जीव, कुटुंबावर शोककळा

मुंबईत १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घाटकोपर परिसरात दुर्घटना घडली होती.  १४०*१४० फूटांचे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून अनेक लोकांचे जीव गेले होते. या दुर्घटनेत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांचाही मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. कार्तिक आर्यनच्या मामा-मामींना घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. मृतांची ओळख पटवल्यानंतर ते कार्तिकचे नातेवाईक असल्याचं समोर आलं. 

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी अनिता चंसोरिया यांचा मृत्यू झाला. मनोज चंसोरिया हे  एअर ट्राफिक कंट्रोल पदावरुन निवृत्त झाले होते. ते दोघेही इंदौर येथे वास्तव्यास होते. मुलाकडे अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईत ते पत्नीसह विसा काढण्यासाठी आले होते. मुंबईहून परतताना घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. 

मीडिया रिपोर्टनुसार, दुर्घटनेनंतर तीन दिवसांनी म्हणजे बुधवारी(१५ मे) मनोज चंसोरिया आणि अनिता चंसोरिया यांचे मृतदेह सापडले. आईवडिलांशी काहीच संपर्क होऊ न शकल्याने मनोज आणि अनिता चंसोरिया यांच्या मुलाने त्यांच्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मनोज यांच्या मित्रांनी मुंबईतील ते थांबले होते त्या ठिकाणी मरोळ गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली. पण, तिथेही ते नव्हते. आईवडिलांचा काहीच पत्ता लागत नसल्याने मनोज यांच्या मुलाने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना त्यांच्या मोबाईलचं  शेवटचं लोकेशन घाटकोपर दुर्घटनास्थळी मिळालं. त्यानंतर कारमध्ये त्यांचे मृतदेह सापडले. 

आईवडिलांच्या मृत्यूनंतर मनोज यांच्या लेकाने ताबडतोड मुंबई गाठलं. मनोज आणि अनिता चंसोरिया यांच्या मृत्यूने कार्तिक आर्यनच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

टॅग्स :कार्तिक आर्यनघाटकोपरमुंबई