सोनू की टीटू की स्वीटी आणि लुका छुपी या चित्रपटानंतर आता कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. आता त्याच्याकडे चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स देखील येत आहेत. कार्तिकने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख स्वतःच्या हिमतीवर बनवली आहे. त्याचा इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नाही. त्यामुळे त्याला सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावा लागला होता. पहिल्या चित्रपटातील त्याचा किसिंग सीन पाहून तर त्याची आईच भडकली होती.
प्यार का पंचनामा या चित्रपटाद्वारे कार्तिकने त्याच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने एक किसिंग सीन दिला होता. पण सुरुवातीला या चित्रपटात किसिंग सीन द्यायला तो तयार नव्हता. त्याच्या कुटुंबियांना ही गोष्ट आवडणार नाही याची त्याला खात्री होती. पण अखेरीस भूमिकेची मागणी असल्याने त्याने किसिंग सीन देण्याचे ठरवले. बिस्कूट टिव्हीला 2013 ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने सांगितले होते की, प्यार का पंचनामा या चित्रपटाच्यावेळी स्क्रीनवर किसिंग सीन द्यायला मी तयार नव्हतो. मी लव्ह सरांना देखील याविषयी सांगितले होते. माझी आजी, आई किसिंग सीन मुळे खूप चिडणार हे मला चांगलेच माहीत होते. मला पहिल्यांदा चित्रपटात किसिंग सीन देताना पाहून माझी आई रडली होती. मी किसिंग सीन दिल्याचे तिला पटले नव्हते. मी अशाप्रकारचे सीन देणे चुकीचे आहे असे तिने मला सांगितले होते. अभ्यास सोडून मी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यामुळे अशाप्रकारचे सीन देऊन मी कुटुंबियांचे नाव खराब करत आहे असे माझ्या घरातल्यांना वाटत होते.
बॉलिवूडमध्ये काम मिळावं म्हणून कार्तिकने बरेच ऑडिशन्स दिले होते. त्यामुळे कॉलेजमधील हजेरी कमी झाल्याने शिक्षणदेखील मध्येच सोडावे लागल्याचंही त्याने सांगितले होते. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कार्तिक जेव्हा मुंबईत आला, तेव्हा तो 2 BHK फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होता. इतकेच नाही तर लोकल ट्रेनमधून तो विनातिकीट प्रवास करायचा. त्यावेळी त्याच्याकडे पैसे देखील नसायचे असे त्याने सांगितले होते. कार्तिकच्या पती, पत्नी और वो या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.