कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने कमाईमध्ये १५० कोटींचा आकडा पार केलाय. लवकरच 'भूल भूलैय्या ३' २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल. 'भूल भूलैय्या ३'मुळे कार्तिक आर्यनची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा आहे. सध्या सुपरहिट सिनेमे करुन कोटींच्या घरात मानधन घेणारा कार्तिक आर्यनला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी मात्र खूप कमी मानधन मिळालं होतं. कार्तिकने स्वतः हा खुलासा केलाय.
कार्तिकला पहिल्या सिनेमासाठी किती मानधन मिळालेलं?
कार्तिकने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. अनेकांना वाटत असेल की, कार्तिक आर्यनला पहिल्याच सिनेमात कोटींच्या घरात मानधन मिळालं असेल. पण तसं काही नाही. कार्तिकचा पहिला सिनेमा अर्थात 'प्यार का पंचनामा'साठी त्याला फक्त ७० हजार रुपये मिळाले होते. पुढे TDS वगैरे कापून कार्तिकच्या हातात पहिल्या सिनेमासाठी ६३ हजार रुपये आले होते.
कार्तिकला होतं टॅक्सचं टेंशन?
कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, "मला सुरुवातीच्या काळात टॅक्सचं खूप टेंशन असायचं. त्यामुळे पहिल्या सिनेमासाठी मानधनातून टॅक्स कापल्याने मला फक्त ६३ हजार रुपये मिळाले होते. याशिवाय मी जी पहिली जाहीरात केली होती त्याचे मला फक्त १५०० रुपये मिळाले होते. सोनू के टिटू की स्विटी या सिनेमानंतर मी खऱ्या अर्थाने पैसे कमवायला सुरु केली." असा खुलासा कार्तिक आर्यनने केला. कार्तिक आज मात्र स्वतःच्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर करोडोंच्या घरात मानधन घेत आहे.