LMOTY Awards 2025 Kartik Aaryan: मुंबईतील राजभवन येथे काल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, तसंच इतर नेतेमंडळी उपस्थित होती. याशिवाय बिझनेस, क्रीडा, शिक्षण, अभिनय क्षेत्रातील काही मान्यवर हजर होते. ज्युरींनी निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रातील एका व्यक्तीला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता कार्तिक आर्यनला यंदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्तिक आर्यनने 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्याने सोहळ्यातील काही फोटो शेअर करत लिहिले, "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर! आदरणीय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 'लोकमत'चे खूप खूप आभार."
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्तिक म्हणाला, "हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी गर्वाची बाब आहे. मी ग्वालियरचा आहे. माझी जन्मभूमी ग्वालियर आहे पण कर्मभूमी मुंबई आहे. मला जे यश मिळालंय ते इथेच मिळालं आहे. सर्वांचं प्रेम मिळालं आहे. मुंबई हा सिनेमाचा गड आहे. मुंबईत पोहोचणं माझं स्वप्न होतं. इथे येणं हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. गीतेत लिहिल्याप्रमाणे फळाची चिंता मी करत नाही कर्म करत जातो. असा महाराष्ट्रीयन अवॉर्ड मिळणं हे जर फळ असेल तर मी चांगलं कर्म करतच राहीन."