बॉलिवूडमध्ये जुन्या सिनेमांचा रिमेक बनवणे ही नवीन बाब नाही. अनेक गाजलेल्या सिनेमांच्या रिमेकनी बॉलिवूडला यशस्वी चित्रपट दिले आहेत. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. १९७८मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.
‘हॅपी भाग जायेगी’चे दिग्दर्शक मुदस्सर अझीज हा रिमेक बनवणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. निर्माते जुनो चोप्रा आणि अभय चोप्रा हे टी- सिरीजचे भूषण कुमार यांच्यासोबत या रिमेकची निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन काम करणार असल्याची चर्चा आहे. कार्तिक सध्या इम्तियाज अलीच्या एका सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. रिमेकमधील कथेची मांडणीही याच अंगाने जाणारी असल्याचे दिग्दर्शक मुदस्सर अझीम यांनी सांगितले. या कथेला आताच्या ट्रेंड्नुसार नवीन लूक देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. या सिनेमातील इतर कलाकारांची नावेही लवकरच जाहीर केली जातील असेही ते म्हणाले.
या व्यतिरिक्त कार्तिक आर्यन ‘लव आजकल’च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि कार्तिकच्या अपोझिट आम्ही साराचे नाव निश्चित केले आहे, असे इम्तियाज अलीने एका मुलाखतीत सांगितले होते. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा होईल असे कळतेय.