Join us

मुंबईत येताना या अभिनेत्याकडे होते केवळ सहा रुपये, आज आहे कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 4:41 PM

या अभिनेत्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते.

ठळक मुद्देघरातल्यांच्या सांगण्यावरून रोनितने शिक्षण तर पूर्ण केले. पण नोकरी करण्याऐवजी त्याने मुंबईत येऊन अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमवायचे ठरवले. रोनित मुंबईला आला, त्यावेळी त्याच्या खिशात केवळ सहा रुपये होते.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील मिस्टर बजाज या भूमिकेने रोनित रॉय घराघरात पोहचला. या मालिकेने रोनित रॉयच्या करियरला एक वेगळी दिशा दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज रोनित छोट्या पडद्यावरचा सर्वात यशस्वी आणि सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. रोनित रॉयचा काल म्हणजेच 11 ऑक्टोबरला वाढदिवस होता. रोनितने छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावर देखील त्याच्या अभिनयाने त्याची एक विशेष जागा निर्माण केली आहे.

रोनित रॉयचे बालपण हे अहमदाबादमध्ये गेले असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. रोनितला नेहमीच अभिनयक्षेत्रात करियर करायचे असल्याने त्याचे मन कधीच अभ्यासात रमले नाही. घरातल्यांच्या सांगण्यावरून रोनितने शिक्षण तर पूर्ण केले. पण नोकरी करण्याऐवजी त्याने मुंबईत येऊन अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमवायचे ठरवले. रोनित मुंबईला आला, त्यावेळी त्याच्या खिशात केवळ सहा रुपये होते. दिग्दर्शक सुभाष घई यांना रोनित ओळखत असल्याने त्यांच्याकडे रोनितला राहाण्याची परवानगी मिळाली. पण सुभाष घई यांच्याकडे रोनित राहात असला तरी त्याला अभिनयक्षेत्रात कोणतीही संधी मिळत नव्हती. अखेरीस कंटाळून त्याने एका हॉटेलमध्ये नोकरी करण्याचे ठरवले. हॉटेलमध्ये टेबल साफ करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत सगळी कामे रोनितला करावी लागत होती.

रोनित नोकरी करत असतानाच त्याला जान तेरे नाम या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. त्यानंतर त्याने सैनिक, हलचल, आर्मी यांसारख्या चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. अभिनयक्षेत्रात आपले करियर होऊ शकत नाही असे रोनितला वाटू लागल्याने तो सिक्युरीटी एजेन्सीच्या व्यवसायाकडे वळला. पण अचानक एकता कपूरने त्याला कसौटी जिंदगी या मालिकेत काम करायची संधी दिली. खरे तर या मालिकेतील ऋषभ बजाज ही त्याची भूमिका केवळ आठ आठवड्यांची असणार असे ठरले होते. पण रोनित रॉयने त्याच्या दमदार अभिनयाने ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे सादर केली.अल्पावधीतच या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यामुळे या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूरने ऋषभ बजाज ही भूमिका मालिकेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेनंतर रोनितने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

टॅग्स :रोनित रॉयएकता कपूर