कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. येत्या 9 डिसेंबरला हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. अद्याप अधिकृत काहीही नाही, पण तयारी जोरात सुरू आहे. अगदी हॉटेल बुकिंगपासून, नववर-वधूंच्या आऊटफिट सिलेक्शनपर्यंत सगळं झालंय. लग्नासाठी येणा-या पाहुण्यांची यादीही तयार आहे. पण या पाहुण्यांना रोज एक नियम सांगितला जातोय आणि यामुळे पाहुणे म्हणे जाम वैतागले आहेत.
होय, लग्न सीक्रेट राहावे यासाठी कॅट व विकीचा आटापीटा सुरू आहे. आता विकी व कॅटच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेल्या एका पाहुण्यानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार, विकी व कॅटच्या लग्नाचं नियोजन करणारी टीम निमंत्रित पाहुण्यांना रोज नव्या नियमाची माहिती देते. यातले काही नियम वा अटी तर अपमानास्पद वाटाव्यात इतक्या कठोर आहेत.‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पाहुण्यांसाठीच्या अटींची यादी बरीच मोठी आहे. पाहुण्यांना काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार लग्नाला हजेरी लावणा-या पाहुण्यांना नवा ‘NDA’ साईन करावा लागणार आहे. म्हणजे, पाहुण्यांना non-disclosure agreement (NDA) साईन करावा लागणार आहे. लग्नात उपस्थित असल्याचा खुलासा करू नये, लग्नसमारंभातील फोटो काढू नये, सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये, सोशल मीडियावर लोकेशन शेअर करू नये, विवाहस्थळ सोडत नाही तोपर्यंत बाहेरील जगाशी संपर्क करू नये अशा एक ना अनेक अटी यात आहेत.
पाहुणा म्हणाला, मग पाहुण्यांना बोलवताच का?कॅट व विकीच्या लग्नाचं निमंत्रण मिळालेला एक पाहुणा चांगलाच वैतागला आहे. अरे हे लग्न आहे, देशाचं सीक्रेट मिशन नाही, जे इतकं लपवलं जातंय. तुम्हाला पाहुण्यांवर इतकाच विश्वास नाही तर मग त्यांना बोलवताच का? अशी भावना या वैतागलेल्या पाहुण्यानं नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर व्यक्त केलीय म्हणे.
विकी आणि कतरिनानं लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याची बाबही समोर आली आहे. कतरिना आणि विकीनं लग्नासाठी एक दोन नव्हे तर 45 हॉटेल्स बुक केली आहेत. विकी आणि कतरिनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.