Kaun Pravin Tambe Biopic : बायोपिक हा लोकप्रिय ट्रेंड. या ट्रेंडमध्ये अनेक खेळाडूंवर सिनेमे आलेत. अगदी एमसी मेरी कॉम, एम. एस. धोनीपासून साइना नेहवालपर्यंत आता आणखी एका खेळाडूच्या आयुष्यावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या खेळाडूचे नाव प्रवीण तांबे (Pravin Tambe) आहे. कौन प्रवीण तांबे? (Kaun Pravin Tambe)असं या चित्रपटाचं नाव आहे. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
येत्या 1 एप्रिलला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे आणि त्याआधी उद्या 9 मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. श्रेयस तळपदे याने ट्विट करत दिली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होतोय. यापूर्वी श्रेयसने क्रिकेटवर आधारीत चित्रपट ‘इक्बाल’मध्ये काम केलं आहे.
कोण आहे प्रवीण तांबे?मुंबईत जन्मलेला प्रवीण तांबे 49 वर्षांचा आहे आणि अद्यापही युवा खेळाडूसारखा टी20 मध्ये खेळतोय. वयाच्या 41 व्या वर्षी प्रवीण तांबेने आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. सन 2012 मध्ये त्याने मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो आयपीएलमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळला. खेळाडू ज्या वयात निवृत्तीचा विचार घेतात, त्या वयात तांबेंला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने 42 व्या वर्षी रणजी ट्रॉफीतदेखील पदार्पण केलं.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्यानंतर तो गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी देखील खेळला. 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना संघात सामील केलं. मात्र, त्याचवर्षी यूएईतील टी10 लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याला कोलकाता संघाकडून खेळता आलं नाही. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली होती. परंतु, मुंबईच्या टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्याने पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. सध्या तो कोलकाता संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत आणि टी10 लीगमध्ये खेळत आहे.