Join us

“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 10:16 AM

Jhund : अनेक दिग्गजांनी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तूर्तास ‘झुंड’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्टही व्हायरल होतेय.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगली हवा आहे. अनेक दिग्गजांनी नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तूर्तास ‘झुंड’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांची पोस्टही व्हायरल होतेय. ‘झुंड’ का पाहायला हवा, याचं कारण केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे.

‘जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून  झुंड  हा चित्रपट पाहा,’असं ट्वीट केदार शिंदे यांनी केलं आहे. ‘झुंड’ हा नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा आहे. या चित्रपटाद्वारे नागराज यांनी हिंदी चित्रपटसृृष्टीत पदार्पण केलं आहे. स्लमसॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित  हा चित्रपट गेल्या 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाने 1.50 कोटींची कमाई केली. चित्रपट बघून बाहेर पडलेला प्रेक्षक चित्रपटाचं भरभरून कौतुक करतोय. सोशल मीडियावरही  या चित्रपटाचं आणि नागराज यांचं भरभरून कौतुक होतंय. त्यामुळे माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर शनिवारी आणि रविवारी ‘झुंड’च्या कमाईत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. शुक्रवारी सिनेमा रिलिज झाल्यावर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कुठल्याही सिनेमाच्या कमाईच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर सर्वांचंच लक्ष आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेता आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :झुंड चित्रपटकेदार शिंदेअमिताभ बच्चननागराज मंजुळे