मुंबई - पाकिस्तानला मदत केली म्हणून शाहरुख खानला नेहमीच ट्रोल करण्यात येते. मात्र, शाहरुख कुठलाही गाजावाजा न करता देशातील नागरिकांच्या संकटांनाही धावून येत असतो. सध्या केरळमधील गंभीर पूरस्थितीनंतर देशभरातून केरळला मदत करण्यात येत आहे. या मदतीसाठी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि शहेनशाह अमिताभ बच्चन पुढे सरसारवले आहेत. तसेच दुलकर रहमान, अनुष्का शर्मा, वरुण धवन आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस यांनीही योगदान दिले आहे.
बिग बी अमिताभ यांनी केरळसाठी मदत केली असून चाहत्यांनाही केरळसाठी मदत देण्याचे आवाहन केले आहे. केरळमध्ये मुसळधार पावसानंतर भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो बंधु-भगिनी अडचणीत आहेत. त्यामुळे केरळच्या मदतीसाठ आपण सर्वांनी एकत्र येणे आणि शक्य तितकी मदत करणे गरजेचे आहे. मी स्वत: काही रक्कम दिली असून तुम्हीही मदत करा, असे ट्विट अमिताभ यांनी केले आहे. तर शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने तेथील पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या एका पथकाला 21 लाख रुपये दिले आहेत. तर जॅकलीन फर्नांडिसनेही 5 लाख रुपये दिले आहेत. तसेच आपल्या मित्र-मैत्रीणींना आणि चाहत्यांनाही आवाहन केले आहे.
चित्रपट निर्माते प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा चेक यापूर्वीच मुख्यमंत्री सहायता निधी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला आहे. येथे कुठलाही धर्म किंवा जात नाही, केवळ मानवता हाच धर्म मानून आपण केरळच्या मदतीसाठी एक होऊया असे आवाहन प्रियदर्शन यांनी केले आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मानेही केरळच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.