Join us

KGF 2 Movie Review: हम गया नहीं जिंदा है..! वाचा कसा आहे 'रॉकी भाई'चा 'केजीएफ २'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 3:04 PM

KGF 2 Movie Review: वास्तववादी जगापासून दूर कल्पना विस्ताराच्या प्रवासात एका जिगरबाज नायकाची कहाणी सांगणारा 'केजीएफ २' चित्रपट फुल टू मनोरंजन करणारा आहे.

चित्रपट परीक्षण : संजय घावरेदर्जा :४ स्टारकलाकार: यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाशराजदिग्दर्शक: प्रशांत नील कालावधी : २ तास ४८ मिनिटे  

या चित्रपटाचा शेवट अजिबात चुकवू नका. अगदी कलाकार-तंत्रज्ञांची नावं आली तरी खुर्चीवरून उठू नका. कारण जिथे सगळं संपलं असं वाटतं तिथेच खऱ्या अर्थाने केजीएफ(KGF 2)ची सुरूवात होते. या चित्रपटातील शेवटचा सीन तुमच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल नक्कीच खुलवेल. लार्जर दॅन हिरो असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. पहिल्या भागाप्रमाणे यातही पुन्हा एकदा कल्पनेच्या पलिकडलं जग पहायला मिळतं, जे शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागाचा प्रभाव किंचीत कमी वाटला तरी पैसा वसूल मनोरंजन आहे. 'हम गया नहीं जिंदा है' असंच काहीसं म्हणत पुन्हा येण्याचे संकेत रॅाकी देतो.

आईची महत्त्वाकांक्षा पूर्ण करत मुंबईवरच नव्हे, तर संपूर्ण भारतावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारा जिगरबाज नायक रॉकी दुसऱ्या भागातही त्याच मूडमध्ये दिसतो. गरुडाला संपवल्यावर त्याचा धाकटा भाऊ केजीएफच्या गादीवर विराजमान होईल असं वाटत असताना रॉकीच त्यावर कब्जा करतो. रॅाकीला संपवण्यासाठी मग जणू मृत्यूला भेदून अधीरा समोर येतो, पण त्यालाही मात देत रॅाकी पुढे जातो. एकटा शत्रूच्या छावणीत घुसतो, दुबईला जाऊन खलीदकडून हत्यारं आणतो, विरोधात असलेल्या पंतप्रधानांना जाऊन भेटतो, एकटाच संसदेत घुसून आपलं सावज टिपतो, अधीराचाही खात्मा करतो आणि अखेरीस जेव्हा सारं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा एक शक्कल लढवतो. त्यानंतर काय होतं ते जाणून घेण्यासाठी थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण चित्रपटाच्या अखेरीस तिसऱ्या भागाचेही संकेत देण्यात आले आहेत.

हा सिक्वेल असल्यानं दोन्ही भागांची तुलना होणारच. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रशांत नील यांच्या लेखन-दिग्दर्शनाची जादू पहायला मिळते. कथा-पटकथा लेखनावर खूपच बारकाईनं काम केल्याचं जाणवतं. पहिल्या भागाप्रमाणेच यातही संवादलेखन, संकलन आणि अभिनय या मुख्य जमेची बाजू आहेत. यात रॉकीचं राॅबिनहूड रूप समोर येतं. ज्यामुळे नायिका त्याच्यावर प्रेम करू लागते, पण लव्ह साँग कथानकात अडथळा ठरतं. कलाकारांची खूप मोठी फौज असली तरी सर्वांच्याच कॉश्च्युम, मेकअप आणि लूकवर मेहनत घेतली आहे. रॉकीनं अधिरावर केलेला अॅटॅक आणि अधिरानं केलेला पलटवार छान शूट केले आहे. केजीएफची साईन ठरलेली ट्यून या भागातही आहे. पार्श्वसंगीत, व्हीएफएक्स, संकलन, कला दिग्दर्शन सर्वच गोष्टीत चित्रपट उजवा आहे. या चित्रपटातही काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. कदाचित ती तिसऱ्या चॅप्टरमध्ये मिळतील.

आपल्याला रॅाकिंग स्टार का म्हटलं जातं हे यश(Yash)नं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या नायकाची भूमिका त्यानं यशस्वीपणे साकारली आहे. श्रीनिधी शेट्टी(Shrinidhi Shetty)नं पहिल्या भागाप्रमाणेच यातही साधारणच अभिनय केला आहे. संजय दत्त(Sanjay Dutt)नं साकारलेला क्रूरकर्मा लक्षात राहील. रवीना टंडन(Raveena Tandon)नं साकारलेली पंतप्रधान पॅावरफुल आहे. प्रकाशराज, मालविका अविनाश, अर्चना जॅाईस, अनंत नाग यांनीही चांगलं काम केलं आहे. वास्तववादी जगापासून दूर कल्पना विस्ताराच्या प्रवासात एका जिगरबाज नायकाची कहाणी सांगणारा हा चित्रपट फुल टू मनोरंजन करणारा आहे.

टॅग्स :केजीएफयश