गेल्या काही वर्षात साऊथच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरनुसता धुमाकूळ घातला आहे. अगदी बॉलिवूडला घाम फोडला आहे. बाहुबली, पुष्पा, आरआरआर आणि आता केजीएफ 2...हा ‘सिलसिला’ थांबण्याची चिन्हं नाहीत. अद्याप ‘केजीएफ 2’ ( KGF Chapter 2) रिलीज झालेला नाही. पण रिलीजच्या आधीच अॅडव्हान्स बुकिंगद्वारेच या चित्रपटाने 25 कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे ‘आरआरआर’ने 1000 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला आहे. बॉलिवूडकरांना याचं ‘टेन्शन’ येणं साहजिक आहे.
अलीकडे सलमान खानने (Salman Khan) ‘आरआरआर’चं कौतुक केलं होतं. रामचरणच्या वाढदिवसाला त्याला विश करताना सलमान ‘आरआरआर’बद्दल भरभरून बोलला होता. पण सोबतच, साऊथचे सिनेमे आपल्याकडे चालतात, मग साऊथमध्ये हिंदी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्नही केला होता. आता भाईजानच्या या प्रश्नाला ‘केजीएफ 2’ सुपरस्टार यशने (Yash) उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत यशला दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या भाईजानच्या प्रश्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर यशने सविस्तर उत्तर दिलं.
काय म्हणाला यश?‘असं काहीही नाही. यापूर्वीही साऊथ सिनेमे बनत होते. पण या चित्रपटांना अशाप्रकारचा प्रतिसाद कधीही मिळाला नव्हता. अनेक वर्षांपासून साऊथचे सिनेमे हिंदीत डब होत आहेत. पण सुरूवातीचे डबिंग आणि आत्ताचे डबिंग यात अभूतपूर्व असा फरक आहे. आता लोकांना डबिंग सिनेमे आवडू लागले आहेत. आम्ही ज्या प्रकारचा कंटेन्ट देतोय, तो प्रेक्षकांना आवडू लागला आहे. आधी हिंदी प्रेक्षक साऊथच्या सिनेमांची खिल्ली उडवायचे. पण आता हळूहळू आमच्या स्टोरीटेलिंगची पद्धत बदलली आहे. अर्थात हे काही एका रात्रीत घडलं नाही.
हळूहळू लोकांना आमचे सिनेमे आवडू लागले. आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, ते लोकांनी समजून घेतले. एसएस राजामौली, प्रभास यांसारख्या कलाकारांनी थेट हिंदी चित्रपट प्रदर्शित करुन प्रेक्षकांना थेट जोडण्याची संधी दिली. मी स्वत: अनेक हिंदी चित्रपट पाहिले आहेत आणि मला ते फार आवडतात. माझ्या मते, बॉलिवूड किंवा साऊथ सगळ्या चित्रपटांना देशभर एकसारखा प्रतिसाद मिळावा, असं मला वाटतं. यासाठी भाषेशिवाय चांगला विषय, चांगले प्रॉडक्शन हाऊस यासारख्या इतर बाबींचाही विचार केला पाहिजे, असं यश म्हणाला.येत्या 14 तारखेला यशचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.