नवी दिल्ली-
रॉकिंग स्टार यश (Yash) याचा ब्लॉकबस्टर चित्रपट केजीएफचा दुसरा पार्ट देखील जोरदार हीट ठरला. याच चित्रपटात काम केलेले अभिनेते हरिश राय यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत ते स्वत: घशाच्या कर्करोगाचा सामना करत असल्याचं म्हटलं आहे. कन्नड सिनेमातील बहुचर्चित अभिनेते असलेले हरिश राय कर्करोगाचा सामना करत असतानाच केजीएफ-२ साठीचं शुटिंग देखील करत होते. कर्करोगामुळे घशाला आलेली सूज लपवण्यासाठी सिनेमात दाढी वाढवली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.
तीन वर्षांपासून कर्करोगाशी सामनाएका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हरिश राय यांनी त्यांच्या कर्करोगाबाबतची सविस्तर माहिती दिली. "अनेकदा नशीब तुमची साथ देतं तर कधी तुमच्या गोष्टी हिरावून देखील घेतं. नशीबाचा खेळ कुणालाच चुकलेला नाही. मी गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाचा सामना करत आहे. केजीएफ सिनेमात माझ्या वाढलेल्या दाढीमागे एक कारण होतं. कर्करोगामुळे माझ्या गळ्याला सूज आली होती आणि ती लपवण्यासाठी दाढी वाढवली होती", असं ते म्हणाले.
कर्करोगावरील उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे उपचार पुढे ढकलल्याचंही हरिश राय यांनी यावेळी सांगितलं. पण यामुळे आता परिस्थिती आणखी गंभीर झाली असल्याचंही ते म्हणाले. "मी माझी सर्जरी काही काळ पुढे ढकलली होती. कारण माझ्याकडे उपचारासाठीचे पुरसे पैसे नव्हते. मी माझे सिनेमे प्रदर्शित होण्याची वाट पाहिली. आता कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर मी येऊन पोहोचलो आहे आणि परिस्थिती गंभीर बनली आहे", असं हरिश राय म्हणाले. मदत करण्यासाठी चाहत्यांना आवाहन करणारा एक व्हिडिओ देखील केला होता, पण तो पोस्ट करण्याची ताकद मी एकवटू शकलो नाही आणि तो व्हिडिओ तसाच राहिला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
केजीएफ-२ मध्ये साकारली महत्वाची भूमिकाकेजीएफ आणि केजीएफ-२ मध्ये हरिश राय यांनी कासिम चाचाची भूमिका साकारली आहे. कासिम चाचा या सिनेमात प्रमुख भूमिका असलेल्या यशच्या म्हणजेच रॉकीच्या वडिलांच्या स्थानी आहेत. कासिम चाचांनीच रॉकीला लहानाचं मोठं केलं आणि वेळोवेळी मदत केली आहे. केएजीएफ सिनेमा भारतातील यशस्वी सिनेमांपैकी एक आहे. २०१८ साली या सिनेमाचा पहिला पार्ट प्रदर्शित झाला होता.
केजीएफ-२ ने बॉक्स ऑफीसवर कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढले आणि तब्बल १२०० कोटींची कमाई केली. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या या सिनेमानं राजामौलींच्या RRR सिनेमालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर यशच्या या सिनेमानं ८६० कोटी रुपये कमावले. यात हिंदी व्हर्जनचा जवळपास ४३५ कोटींचा वाटा राहिला आहे.
अभिनेते हरिश राय हे गेल्या २५ वर्षांपासून कन्नड सिनेमांमध्ये काम करत आहेत. केजीएफ व्यतिरिक्त त्यांनी बँगलोर अंडरवर्ल्ड, धन धना धन आणि नन्ना कनसिना हुवे यांसारख्या बहुचर्चित सिनेमांत देखील काम केलं आहे.