कुमार मंगत पाठक व अभिषेक पाठक निर्मित आणि फारुख कबीर दिग्दर्शित 'खुदा हाफिज' चित्रपटात बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...
'खुदा हाफिज' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?फारुख कबीर 'खुदा हाफिज'चे दिग्दर्शक आहेत. ज्यांनी यापूर्वी 'अल्लाह के बंदे' चित्रपट बनविला होता. ते हैदराबादमध्ये होते. तेव्हा त्यांनी वृत्तपत्रात एक लेख वाचला होता. ज्यात एका जोडप्यांबद्दल लिहिण्यात आले होते. 2008 त्या दोघांचे लग्न झाले होते आणि त्याच दरम्यान उद्योग धंद्यात मंदी आल्यामुळे त्या दोघांचे जॉब गेले होते. त्यानंतर त्याची पत्नी बाहेर गावी नोकरीसाठी गेली आणि तिथे पोहचल्यापासून तिचा थांगपत्ता लागत नव्हता. मग, तिला शोधण्यासाठी नवऱ्याने केलेला खडतर प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. रोमांस आणि एक्शन यात पहायला मिळणार आहे.
तू अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातोस, या चित्रपटात वेगळे अॅक्शन सीक्वेन्स पहायला मिळणार आहेत का ?या चित्रपटात वेगळे अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे. साधारण बऱ्याच चित्रपटात नायक वीस-तीस लोकांसोबत मारामारी करताना दिसतो. मात्र खुदा हाफिज चित्रपटात समीर चौधरी नामक एका सामान्य माणसाची कथा दाखवण्यात आल्यामुळे मला प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीप्रमाणे अॅक्शन सीक्वेन्स करावे लागले. मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेऊनही न घेतले असल्याचे दाखवणे माझ्यासाठी खूप चॅलेजिंग होते. ही खूप मजेशीर बाब होती. मनापासून आणि जीव तोडून लढल्यानंतर तुम्ही जिंकू शकता, हे चित्रपटात पहायला मिळेल. त्या मुलीची कथादेखील अशीच आहे.
या चित्रपटात तू अॅक्शनसोबत रोमान्सही करताना दिसणार आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील?नेहमी मला माझे चाहते व लोक सोशल मीडियावर सर एक रोमँटिक चित्रपट करा, असे सांगत असतात. त्यामुळे यात अॅ क्शन व रोमांस दोन्ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशाप्रकारची भूमिका मी यापूर्वी केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना माझी भूमिका व चित्रपट भावेल, अशी मला आशा आहे आणि या चित्रपटाबाबत मी उत्सुक आहे. दिग्दर्शक फारूख कबीर यांच्याबद्दल काय सांगशील?मी मॉडेलिंगमध्ये असताना फारूख कबीर यांचा अल्लाह के बंदे मी चित्रपट पाहिला होता. मला तो खूप आवडला होता. जेव्हा ते मला खुदा हाफिजची स्क्रीप्ट ऐकवायला आले तेव्हा कळले ते हेच दिग्दर्शक आहेत. त्यांना संगीताची जाण चांगली आहे. तसेच कथा सांगण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली.
या चित्रपटाचा अनुभव कसा होता?खूप वेगळा अनुभव होता. काही सीन्स वाळवंटात आणि लखनऊमध्ये शूटिंग केले आहे. एकीकडे खूप थंडी तर दुसरीकडे खूप गरमी अशा तापमानात चित्रपटाचे शूटिंग केले आहे. माझा हा पहिला चित्रपट आहे ज्याचे वाळवंटात शूटिंग पार पडले आहे. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिले असेल खूप वेगळे आणि सुंदर लोकेशन्स आहेत. लखनऊमधील गल्ल्यांमध्ये तिथल्या संस्कृतीप्रमाणे शूट केले आहे. त्यामुळे खूप मजा आली. बॉलिवूडमधील आतापर्यंतच्या प्रवासाबाबत तू कितपत समाधानी आहेस?मला माझा बॉलिवूडमधील प्रवास अविश्वसनीय वाटतो. मला जेवढे हवे होते त्यापेक्षा जास्त मिळाले आहे. आता मागे वळून पाहतो तर देवाची कृपा माझ्यावर असल्याचे वाटते. आपल्याला काम मेहनत आणि मनापासून केले पाहिजे, असे मला वाटते. आज नाही तर उद्या यश आपल्याला नक्कीच मिळेल. या जगाने मला खूप काही दिले आहे. मी फक्त चित्रपटाशीच नाही तर कलारिपयाटू, मार्शल आर्ट्सशी देखील जोडलो गेलो आहे. ज्याने मला खूप काही दिले आहे. मला चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या आहेत. त्यामुळे माझा बॉलिवूडमधील प्रवास खूप समाधानकारक आहे.आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही.
- तेजल गावडे