जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट ‘धडक’ रिलीज झाल्यानंतर बोनी कपूर व श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर ही सुद्धा अभिनय करणार आहे. होय, आपल्या मोठ्या बहिणीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट बघून आणि तिचा यशस्वी डेब्यू बघून खुशीच्या मनातही हिरोईन बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने जन्म घेतला आहे. खुद्द खुशीचे पापा बोनी कपूर यांनी हा खुलासा केला आहे.अलीकडे ‘धडक’ रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाने जान्हवीला खुशीबद्दल एक प्रश्न विचारला होता. तुझ्यासारखीच तुझी लहान बहीणही अॅक्टिंगच्या दुनियेत येणार का, असा प्रश्न तिला केला गेला होता. हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही तिला विचारलेले बरे, असे सांगून जान्हवीने हा प्रश्न टाळला होता. तिच्या या उत्तराने अनेकांची निराशा केली होती. पण आता खुद्द पापा बोनी कपूर यांनीच खुलासा केल्यावर जान्हवीप्रमाणेच खुशीही लवकरच अॅक्टिंग डेब्यू करणार, हे स्पष्ट झाले आहे.
अलीकडे एका ताज्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी खुशीच्या निर्णयाबद्दल सांगितले. ‘चित्रपटात येण्यासाठी मी जान्हवीला प्रोत्साहित केले, असे मी म्हणणार नाही. पण हो, मी तिला स्वातंत्र्य जरूर दिले. तुला जे करायचे ते कर, हेच मी तिला सांगितले. शेवटी तिच्या इच्छेचा बळी घेणारा मी कोण? अर्जुनमध्ये अॅक्टिंगचे गुण आहेत, हे सलमानने सांगेपर्यंत मलाही ठाऊक नव्हते. पण त्याचे हे गुण समोर आल्यानंतर त्यालाही मी तेवढीच मोकळीक दिली. अंशुलाचे म्हणाल तर तिला शिक्षणात अधिक रस आहे. खुशी आधी मॉडेल बनू इच्छित होती. पण आता तिचा कल अभिनयाकडे दिसतोय. आता तिलाही अभिनय क्षेत्रात यायचे आहे’, असे बोनी कपूर म्हणाले.मृत्यूपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवी यांनीही खुशीला मॉडेलिंगमध्ये रस असल्याचे सांगितले होते. खरे तर जान्हवीने डॉक्टर बनावे आणि खुशीने अभिनेत्री, अशी श्रीदेवींची इच्छा होती. पण जान्हवीने अभिनेत्री व्हायचे ठरवले, तेव्हा त्या तिच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आज खुशीचा निर्णय ऐकूनही त्यांनी हेच केले असते.