बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान सध्या ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहे. शनिवारी एनसीबीने मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर छापा टाकला. यावेळी या क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं. या पार्टीमध्ये आर्यन खान सहभागी असल्यामुळे सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे. विशेष म्हणजे अनेकांनी शाहरुख आणि आर्यनवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच शाहरुखचा 'फेमिना'ला दिलेला एक जुना इंटरव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुखने त्याच्या घरात नेमकं कसं वातावरण असतं आणि आर्यनला घरात कसं वागावं लागतं हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे आर्यन घरात प्रचंड धाकात वाढल्याचं सांगण्यात येतं.
"माझ्या मुलाने घरात शर्टलेस होऊन फिरलेलं मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी त्याला घरात शर्टलेस होऊन फिरण्यास सक्त मनाई केली आहे. मी स्वत: महिलांचा खूप आदर करतो. त्यामुळे आर्यननेदेखील तसंच करावं असं मी कायम त्याला सांगत असतो", असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
पुढे तो म्हणतो, "मी माणसांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतो. घरात आई-वडील, बहीण असं कुटुंब असतं. त्यामुळे त्यांच्यासमोर कसं वावरलं पाहिजे, कसे कपडे घातले पाहिजेत याविषयी मी फार काटेकोरपणे नियम पाळतो आणि तेच मुलांनाही पाळायला लावतो. मुळात, माझा हा आग्रह चुकीचा आहे असं मला वाटत नाही. ते मॅनर्स आहेत. समाजात आपली ओळख संस्कारांनी होत असते हे लक्षात ठेवलं पाहिजे."
बॉलिवूड आणि ड्रग्सचं आहे जुनं कनेक्शन
बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन तसं जूनंच आहे. यापूर्वी देखील ड्रग्स प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नाव समोर आली आहेत. रकुल प्रीत सिंग,रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, एजाज खान यांची नाव ड्रग्स प्रकरणात आली होती.