आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. दोघांना आझाद हा १२ वर्षांचा मुलगा आहे. तीन वर्षांपूर्वीच आमिर आणि किरण वेगळे झाले. तेव्हा आजाद फक्त ९ वर्षांचा मुलगा होता. आईवडिलांच्या घटस्फोटाचा त्याच्यावर काय परिणाम झाला यावर किरण रावने नुकतंच उत्तर दिलं आहे. घटस्फोट म्हणजे दोरी कापणं किंवा परत बांधणं असा होत नाही असंही ती म्हणाली.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत किरण राव म्हणाली, "आमच्यात अगदी कडाक्याची भांडणं होऊन घटस्फोट झालेला नाही. सगळं खूपच स्मूदली झालं. आम्ही वेगळे होऊ हा निर्णय घेण्याच्या स्टेजपर्यंत जायला आम्हाला वेळ लागला. बराच काळ आम्ही नात्यावर काम करत होतो. जेव्हा आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा अगदी विचारपूर्वक घेतला होता. आम्ही कधीच भांडलो नाही. आमच्यात थोडेफार खटके उडायचे पण असं नाही की १२ तास ते संपणारच नाहीत. मुलं आपल्या पालकांसोबत वाद घालतात तशीच आमची भांडणं असायची."
ती पुढे म्हणाली, "आम्हाला माहित होतं की या नात्यात बरंच काही वाचवायचंही होतं. आम्हाला मुलाला उकळत्या पाण्यात ढकलायचं नव्हतं. आम्ही दोरी कापल्यासारखं नाही तर ती सोडवण्यासारखं केलं. यात आम्ही वेळ घेतला आणि हळूहळू सोडवलं. म्हणूनच काही प्रमाणात हा क्लोजर होता. कुटुंब आणि आजादच्या मनात एकमेकांबद्दल विश्वास बनवण्याची त्यामागे भावना होती. त्याला हे जाणवायलाच नको की आमच्यात काहीतरी तुटतंय असा आम्ही प्रयत्न केला."२००५ साली किरण राव आणि आमिर खान लग्नबंधनात अडकले होते. २०११ साली त्यांना सरोगसीद्वारे आजाद मुलगा झाला.