Join us

"आम्ही डेट करायला लागलो आणि आमिरचा घटस्फोट झाला, असं...", किरण राव स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:49 AM

आमिरने किरण रावला डेट केल्यामुळेच पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा होत्या. याबाबत आता किरणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. 

आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. पण, सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यांनी २०२१मध्ये वेगळं होण्याची घोषणा केली. किरण राव आणि आमिरने २००५मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी ते काही वेळ डेट करत होते. आमिरने किरण रावला डेट केल्यामुळेच पहिली पत्नी रीना दत्ताशी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा होत्या. याबाबत आता किरणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. 

किरण रावने नुकतीच 'झूम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आमिर आणि तिच्या नात्याबाबत भाष्य केलं. 'लगान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान किरण आणि आमिरमध्ये जवळीक निर्माण झाल्यामुळे आमिरने पहिली पत्नी रीनाशी घटस्फोट घेतल्याचं बोललं जात होतं. पण, लगानच्या शूटिंगवेळी आम्ही एकमेकांशी बोलतही नसल्याचा खुलासा किरणने केला. ती म्हणाली, "बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी आणि आमिर लगानपासूनच एकत्र होतो. पण, तसं नाही. आम्ही स्वदेश सिनेमाच्या वेळी एकत्र आलो. तेव्हा तो मंगल पांडेसाठीही शूट करत होता. आशुतोष गोवारीकर यांच्या काही प्रोजेक्टसाठी तेव्हा आम्ही एकत्र काम केलं होतं. पण, लगाननंतर ३-४ वर्षांनी आम्ही एकत्र आलो. मी त्याच्या संपर्कातही नव्हते." 

"लगान सिनेमाच्या शूटिंगवेळी मी आमिरशी जास्त बोलायचेही नाही. जेव्हा २००४मध्ये आमिर आणि मी बाहेर एकत्र दिसायला लागलो. तेव्हा लोकांना वाटायचं की आम्ही लगानपासून एकत्र आहोत आणि त्यामुळेच त्याचा घटस्फोट झाला. पण, हे खरं नाही," असंही पुढे किरण रावने सांगितलं. 

आमिरने पहिली पत्नी रीनाला २००१ मध्ये घटस्फोट दिला. त्यानंतर २००४मध्ये त्याने दुसरं लग्न करत किरण रावबरोबर संसार थाटला. आमिर आणि किरणला आझाद हा मुलगा आहे. नुकताच किरणचं दिग्दर्शन असलेला 'लापता लेडीज' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची निर्मिती आमिर खानने केली आहे. 

टॅग्स :आमिर खानकिरण रावसेलिब्रिटी