Join us

Kirron Kher Health Update: किरण फायटर आहे; ती आजारावर नक्की मात करेल...! अनुपम खेर यांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 12:53 PM

Kirron Kher Health Update: अनुपम यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली. अफवा पसरू नये म्हणून हे शेअर करतोय, हे त्यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

ठळक मुद्देकिरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री व खासदार किरण खेर (Kirron Kher)  यांच्या चाहत्यांना गुरुवारी धक्का बसला. किरण यांना ब्लड कॅन्सर (Kirron Kher Blood Cancer) असल्याचे कळताच, चाहते चिंताग्रस्त झालेत. यानंतर तमात चाहत्यांनी किरण खेर या लवकर ब-या व्हाव्यात, यासाठी प्रार्थना सुरु केल्यात. याचदरम्यान किरण यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्विट करून पत्नीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.अनुपम यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली. अफवा पसरू नये, म्हणून हे शेअर करतोय, हे त्यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.

अनुपम यांची पोस्ट...

अनुपम यांनी लिहिले, मी आणि सिकंदर हे सांगू इच्छितो की, किरण मल्टीपल मायलोमा  (Multiple Myeloma) एक प्रकारच्या ब्लड कॅन्सरने पीडित आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ती आधीपेक्षा अधिक खंबीर बनून या आजारातून बाहेर येईल. आम्ही नशीबवान आहोत की, उत्तम डॉक्टरांची टीम किरणवर उपचार करतेय. ती फायटर आहे आणि या संकटालाही ती परतवून लावेल.  किरण खेर जे काही करते ते मनापासून करते. तिचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. म्हणूनच लोक तिच्यावर इतके प्रेम करतात. ती ठीक आहे आणि बरी होतेय. तुमच्या प्रेम आणि पाठींब्यासाठी आभार.

भाजपा चंदीगडचे सदस्य अरूण सूद यांनी बुधवारी एका विशेष पत्रकार परिषदेत किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले, ‘गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाला. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होते. त्यामुळे गेल्या 4 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते. अलीकडे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 4 महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज नाहीये. फक्त चाचण्या व उपचारासाठी नियमितपणे रूग्णालयात जावे लागणार आहे.

किरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर (anupam kher) यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

टॅग्स :किरण खेरअनुपम खेर