Kishore Kumar Birth Anniversary : आपली सदाबाहार गाणी आणि अभिनयाने लोकांची मनं जिंकणाऱ्या किशोर कुमारांनी इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून एन्ट्री केली होती. किशोर कुमार यांचा पहिला चित्रपट 'शिकारी' 1946मध्ये रिलिज झाला होता. चित्रपटामध्ये किशोर यांचे मोठे भाऊ अशोक कुमार लीड रोलमध्ये होते. परंतु गायक म्हणून किशोर कुमार यांनी 1948मध्ये सुरुवात केली. देवानंद यांच्या 'जिद्दी' (1948) या चित्रपटातून त्यांनी गायक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अशी हिट गाण्यांची मेजवानी आपल्या चाहत्यांना दिली. पण एक वेळ अशी देखील होती की, ज्यावेळी किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. याचं उदाहरण खुद्द पंतप्रधान मोदींनीही काँग्रेसवर टीका करताना लोकसभेमध्ये दिलं होतं.
1975मध्ये जेव्हा इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी जाहीर झाली होती त्यावेळी या आणीबाणीचा फटका किशोर कुमार यांनाही बसला होता. असं म्हटलं जातं की, किशोर कुमार आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ होते. कदाचित यामुळेच त्यांच्या गाण्यांना बॅन करण्यात आलं होतं.
त्याचे असे झाले की, आणीबाणीच्यावेळी काँग्रेसला सरकारी योजनांची माहिती गाण्यामधून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एका गायकाची गरज होती. त्यासाठी त्यांनी किशोर कुमार यांना संपर्क केला होता. इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये त्यावेळी सूचना प्रसारण मंत्री वीसी शुक्ला होते. त्यांनी किशोर कुमार यांना निरोप पाठवला की, त्यांना इंदीरा गांधींसाठी गाणं गायला सांगितलं आहे. ज्यामुळे सरकारचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. परंतु किशोर कुमार यांनी गाणी गाण्यासाठी नकार दिला. किशोर कुमार यांना ही गाणीं कशासाठी पाहिजेत असं विचारलं असता त्यावेली त्यांना असं सांगण्यात आलं की, प्रसारण मंत्री वीसी शुक्ला यांचा आदेश आहे त्यामुळे तुम्हाला ही गाणी गायची आहेत.
आदेश असा शब्द ऐकताच किशोर कुमार चिडले आणि त्यांच्यासाठी निरोप घेऊन येणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावत स्पष्ट नकार दिला. हा नकार काँग्रेसला पचवणं फार कठिण होतं. या नकाराच्या बदल्यात काँग्रेसने किशोर कुमारांची सर्व गाणी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवरून बॅन केली. तेव्हापासून ते आणीबाणी संपेपर्यंत किशोर कुमार यांची गाणी रेडिओ आणि दूरदर्शनवरून प्रसारीत केली जात नव्हती.
आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या किशोर कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं की, 'ती सरकारी लोकं माझ्याकडे कशासाठी आली होती ते मला माहीत नाही, परंतु, माझ्या मनाविरूद्ध कोणीही कोणतीही गोष्ट करण्यासाठी मला जबरदस्ती करू शकत नाही. मी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छेसाठी किंवा हुकूमासाठी गात नाही.'