Join us

Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:19 IST

किशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिले. 

किशोर कुमार यांनी एक गायक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून आपली बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. आज त्यांच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. किशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिले. 

किशोर कुमार यांनी चार लग्न केली होती. त्यांचे पहिले लग्न 1951 मध्ये अभिनेत्री रूमा गुहा यांच्यासोबत झाले होते. त्यावेळी किशोर कुमार बॉलिवूडमध्ये इतके नावाजलेले नव्हते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 1958 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्या दोघांना अमित हा मुलगा आहे. त्यांच्या घटस्फोटाचे मुख्य कारण म्हणजे किशोर कुमार आणि रूमा यांच्यातील करिअरबाबत झालेले वाद. खरं तर किशोर यांना लग्नानंतर रूमाने घर सांभाळावं असं वाटत होतं. पण रूमाला मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव कमावायचं होतं. 

रूमाशी घटस्फोट झाल्यानंतर किशोर कुमार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री मधुबाला यांच्याशी विवाह केला. त्यावेळी मधुबालाने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केलं होतं. मधुबाला या मुस्लीम होत्या. त्यांच्याशी लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी मुस्लीम धर्म देखील स्वीकारला होता. पण मधुबाला आणि किशोर यांचे नातं मधुबालाच्या घरच्यांनी कधीही स्वीकारलं नाही. किशोर कुमार यांचा मधुबालासोबतचा संसार फार काळ चालला नाही. कारण हृदयाला असलेल्या छिद्रामुळे मधुबाला यांचं निधन झालं. 

मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. या दोघांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. 1976 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण अवघ्या दोन वर्षांतच यांचा संसार मोडला आणि त्यानंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं. योगिता यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर किशोर यांच्या आयुष्यात अभिनेत्री लीना चंदावरकर आल्या. लीना आणि किशोर कुमार यांच्यात वयाचे प्रचंड अंतर असल्याने त्यांच्या लग्नाला घरातल्यांचा चांगलाच विरोध होता. पण तरीही त्या दोघांनी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव सुमित आहे. 

टॅग्स :किशोर कुमारअमित कुमारमधुबालालीना चंदावरकरयोगिता बाली