बॉलिवूड अभिनेत्री योगिता बाली यांचे सुंदर डोळे आणि सुंदर हास्य त्यांची ओळख होती. योगिता बाली यांनी 1971 साली आलेल्या परवाना सिनेमातून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्या अजनाबी, अपराधी, कुंवर बाप, मेहबुबा आणि जानी दुश्मन या चित्रपटांमध्ये झळकल्या होत्या. योगिता बाली त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन पण खूप चर्चेत राहिल्या.
योगिता बाली शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली यांच्या भाची होत्या. बॉलिवूडमध्ये चाहत्यांची कमी नव्हती. असे असूनही, बहुतेक प्रथम श्रेणी अभिनेत्रींना नकार दिलेल्या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या.
एकदा योगिता बाली यांना किशोर कुमार यांच्याबरोबर 'जमुना के तीर' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट अर्धावट राहिला पण किशोर कुमार यांच्यावर त्या भाळल्या आणि दोघांनी लग्न केले. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. 1976 मध्ये झालेले हे लग्न 1978 मध्ये संपुष्टात आलं. असे म्हटले जाते की याला कारण योगिता यांची आई त्यांच्या वैवाहीक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करत होत्या. किशोर कुमारा यांना हे अजिबात पसंत नव्हते आणि दोघांनीही वेगळे होण्याचे ठरवले. त्यांनंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं. मिथुन आणि योगिता यांची भेट ख्वाब या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
योगिता बाली आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या लग्नानंतर किशोर कुमार यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणे बंद केले. मिथुन आणि योगिता यांच्या लग्नाचा किशोर कुमार यांना चांगलाच धक्का बसला होता असे म्हटले जाते. पण त्या दोघांच्या लग्नानंतर काही वर्षांनी सगळे काही विसरून सुरक्षा आणि वक्त की आवाज यांसारख्या चित्रपटांसाठी किशोर यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणी गायली.