सध्या सगळीकडेच व्हॅलेंटाइन वीकचे वारे वाहत आहेत. आज व्हॅलेंटाइन वीकमधला Kiss Day आहे. आज काल सिनेमात आणि वेब सीरिजमध्ये सर्रास किसींग सीन आणि इंटिमेट सीन दाखवले जातात. अनेकदा अशा सीन्समुळे वादही झालेले आहेत. पण, बॉलिवूडमध्ये पहिला किसिंग सीन कोणत्या सिनेमात दिला गेलेला हे तुम्हाला माहीत आहे का?
जवळपास ९१ वर्षांपूर्वी बनलेल्या सिनेमात पहिला किसिंग सीन दिला गेला होता. पण, अभिनेत्रीने किसिंग सीन दिल्यामुळे सिनेमावरच बंदी घालण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९३३ साली कर्मा नावाचा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. हा सिनेमा एक रोमँटिक ड्रामा होता. एका ब्रिटीश दिग्दर्शकाने हा सिनेमा बनवला होता. या सिनेमात हिमांशू रॉय आणि देविका रानी मुख्य भूमिकेत होते. कर्मा सिनेमा शूट करण्याआधीच त्या दोघांचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं होतं.
खऱ्या आयुष्यात कपल असणाऱ्या या दोघांनी ऑनस्क्रीनही रोमान्स केला. ६३ मिनिटांच्या सिनेमात देविका रानी आणि हिमांशु यांनी तब्बल ४ मिनिटांचा लिपलॉक सीन दिला होता. या सीनची प्रचंड चर्चा रंगली होती. किसिंग सीनमुळे मोठी खळबळ उडाली होती. आणि त्यामुळे सिनेमा बॅन केला गेला. लिपलॉक सीनमुळे हा सिनेमा केवळ भारतातच नाही तर युरोपमध्येही चर्चेत होता. पण, असं असलं तरी बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमा फ्लॉप झाला होता.