सध्या 'पुष्पा २'ची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमातील अल्लू अर्जुनचा अभिनय आणि त्याची रश्मिका मंदानाची केमिस्ट्री चांगलीज गाजली. फहाद फासिलने साकारलेल्या खलनायकी भूमिकेचीही चांगलीच चर्चा रंगली. 'पुष्पा २'मध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा झाली ती म्हणजे अभिनेश्री श्रीलीला. 'पुष्पा २'मध्ये किसिक गाण्यावर भन्नाट डान्स करुन श्रीलीला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता श्रीलीला कार्तिक आर्यनसोबत बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या सिनेमाचं नावही निश्चित झालंय.
श्रीलीला या सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू
अभिनेत्री श्रीलीला आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार श्रीलीला कार्तिक आर्यनसोबत आगामी सिनेमात झळकणार आहे. कालच करण जोहरने त्याच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत आगामी सिनेमाची घोषणा केली. 'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून श्रीलीला झळकणार आहे. अजूनतरी या गोष्टीची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही धर्मा प्रॉडक्शनकडून श्रीलीलाचं नाव पक्क करण्यात आल्याचं समजतंय.
श्रीलीला आणि कार्तिकची जोडी जमणार?
मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. सत्यप्रेम की कथा या सिनेमानंतर समीर विद्वांस पुन्हा एकदा कार्तिक आर्यनचा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. हा सिनेमा २०२६ ला रिलीज होणार आहे. पुढील वर्षी २०२५ ला या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. एकूणच 'पुष्पा २'मधील 'किसिक गर्ल' श्रीलीला हिला बॉलिवूडची लॉटरी लागलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कार्तिक-श्रीलीला ही नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांना किती आवडणार, हे येणाऱ्या काळात समजेलच.