KK dies at 53: युवा पिढीच्या हृदयाच्या जवळचा आवाज असलेल्या गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांचं काल कोलकातामध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला आणि सर्वांना धक्काच बसला. केके यांच्या मृ्त्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल. पण एका धडधाकट व्यक्तीची लाइव्ह शोमध्ये प्रकती खराब होते काय आणि हॉस्पीटलमध्ये दाखल होताच त्याला डॉक्टर मृत घोषीत करतात काय हे सारंच आता एक कोडं बनलं आहे. यातच केके यांचा कोलकातामध्ये ज्या ठिकाणी शो होता तिथं क्षमतेपेक्षा अधिक लोक उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे.
ना स्टारडमची हवा, ना कोणतंही व्यसन अन् बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्न, 'सिंपल मॅन' केकेची कहाणी..
कोलकाताच्या नाजरुल मंच ऑडिटोरियममधील कॉन्सर्टनंतर केके यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थेट त्यांच्या मृत्यूचीच बातमी समोर आली. दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर जाण्यापूर्वी केके अगदी उत्तम आणि ठणठणीत होते. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोलकाता दौऱ्याबाबत उत्सुक असल्याची एक पोस्ट देखील शेअर केली होती. तर तीन दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातही एक लाइव्ह कॉन्सर्ट केला होता. "पुण्यात ZS मधील तरुणाईसोबत धमाल केली. जबरदस्त वातावरण आणि तुम्ही दिलेलं प्रेम यामुळे कॉन्सर्ट खास बनला", अशी एक पोस्ट देखील केके यांनी शेअर केली होती.
केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेची खूण; पोलिसांनी दाखल केली अनैसर्गिक मृत्यूची केस
केके यांनी सोमवारी कोलकाताला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावरुनही पोस्ट शेअर केली होती. केके यांनी त्यांच्या बँडमधील सदस्यांसोबत एक फोटो शेअर केला होता आणि कोलकाता दौऱ्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. कोलकाताच्या नाजरुल मंच ऑडिटोरियममध्ये केके यांचा कॉन्सर्ट सुरू झाला. तुफान गर्दी झाली होती. "आखों में तेरी", "खुदा जानें", "आशाएं" आणि "मेक सम नॉइज फॉर देसी बॉईज" ही गाणी केके यांनी या शोमध्ये गायली. कॉन्सर्ट रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. मग ते त्यांच्या रुममध्ये गेले व तिथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
'याद आएंगे ये पल...' गाता गाता फॅन्सना रडवून गेला केके, शेवटच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल
नाजरुल मंच ऑडिटोरियममध्ये केके यांच्या कॉन्सर्टला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी एकानं दिलेल्या माहितीनुसार नाजरुल मंच हे बंद सभागृह खचाखच भरलं होतं आणि एसी यंत्रणा देखील व्यवस्थित सुरू नव्हती. घामाघूम झालेल्या केके यांना स्टेजवर उष्णता जाणवत होती आणि त्यांनी आयोजकांना त्यांच्यावरील स्पॉटलाइट्स मंद करण्यासही सांगितलं होतं. यासोबत सभागृहातील गर्दीबाबतही केके यांनी आयोजकांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यक्रमस्थळी केके यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यात केके सभागृहातील गोंधळलेल्या परिस्थितीबद्दल तक्रार करत असताना, हातरुमालाने चेहरा पुसताना दिसत आहेत. तसंच ते एका व्यक्तीला वेंटिलेशनबद्दल विचारत अससल्याचंही दिसून आलं आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची परिस्थिती आणखी बिघडली होती आणि ते कोसळले अशी माहिती पीटीआयनं दिली आहे. "केके यांना रात्री 10 च्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. आम्ही त्यांच्यावर उपचार करू शकलो नाही हे दुर्दैव आहे”, असं डॉक्टरांनी सांगितल्याचंही वृत्त पीटीआयनं दिलं आहे.