KK Last Performance Video: KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. कोलकातामध्ये एका कॉन्सर्टनंतर केकेची तब्येत अचानक बिघडली होती. यानंतर त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
केकेच्या अशा अचानक जाण्याने फॅन्स आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील सिनेमांची गाणीही गायली होती. केकेचं वय केवळ ५३ वर्षे होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहसहीत अनेकांनी त्याच्या निधनावर दु:खं व्यक्त केलं आहे.
रिपोर्टनुसार, केके दोन दिवसांच्या कॉन्सर्टसाठी कोलकाता येथे आला होता. सोमवारीही केकेचं एक कॉन्सर्ट झालं होतं. विवेकानंद कॉलेजमध्ये त्याने कॉन्सर्ट केला होता. पण दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडली होती.
केकेच्या शेवटच्या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो त्याचं प्रसिद्ध गाणं ‘हम रहें या ना रहें कल…’ गाताना दिसत आहे. केकेची अनेक गाजलेली गाणी ही नेहमी त्याच्या फॅन्ससोबत राहणार आहे.