कंगना राणौत व शिवसेना यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने केलेल्या कारवाईनंतर कंगनाचा संताप अनावर झाला असून 12 सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत तिने जोरदार टीका केली आहे.कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण करणा-या बेधडक कंगनाने आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांशी ‘पंगा’ घेतला. आजही हा ‘सिलसिला’ सुुरुच आहे.
आलिया भट
अलीकडे कंगनाने अभिनेत्री आलिया भटशी विनाकारण पंगा घेतला. आलिया ही करण जोहरच्या हातची कळसूत्री बाहुली आहे. स्वार्थी आहे, असे कंगना म्हणाली होती. अर्थात कंगनाच्या या टीकेनंतरही आलियाने मौन बाळगणे पसंत केले होते.
सोनू सूद
‘मणिकर्णिका’ या कंगनाच्या अलीकडे आलेल्या चित्रपटादरम्यान सोनू सूद व कंगनाच्या वादाचा एक अंक गाजला होता. कंगनाने ‘मणिकर्णिका’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेताच सोनू सूदने या चित्रपटातून अंग काढून घेतले होते. सोनू सूदने चित्रपट सोडल्यावर कंगना चांगलीच बिथरली होती. दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोप गाजले होते.
हृतिक रोशन
हृतिक रोशन व कंगना यांचा वाद बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. क्रिश या चित्रपटाच्या सेटवर हृतिक व माझे अफेअर होते, असा दावा कंगनाने केला होता. पण या अफेअरची चर्चा होण्यापेक्षा या दोघांच्या वादाचीच अधिक चर्चा झाली. २८ जानेवारी २०१६ मध्ये एका मुलाखतीत कंगनाने ‘सिली एक्स’ असा हृतिकचा उल्लेख केला आणि यानंतर दोघांचेही प्रायव्हेट अफेअर चव्हाट्यावर आले होते. हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली. कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली. यानंतर दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटले होते. कंगनाने मला १४३९ ईमेल पाठवले होते. यापैकी ब-याच ईमेलकडे मी दुर्लक्ष केले. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते. कंगना ही मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. यामुळे ती कल्पनेत जगते. कल्पना रंगवते, असा आरोप हृतिकने केला होता. कंगनानेही हृतिकवर आरोप ठेवले होते. हृतिकनेच माज्याशी बोलण्यासाठी खास ईमेल आयडी तयार केला होता. हृतिक व सुझैनचे (हृतिकची पूर्व पत्नी) नाते, त्यांच्यातील घटस्फोट याबाबत हृतिकने अनेकदा माज्याशी वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या, असे कंगना म्हणाली होती. प्रकरणानंतर हृतिकने माझी माफी मागायला हवी. तो माफी मागत नाही, तोपर्यंत मी या प्रकरणावर बोलणार, असे कंगना म्हणाली आहे.
करण जोहर
हृतिकप्रमाणेच करण जोहरसोबतचा कंगनाच्या वादाचीही प्रचंड चर्चा झाली होती. करणच्याच ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये गेस्ट म्हणून गेलेली कंगना करणलाच नाही, नाही ते बोलून आली होती. करणला ‘मुव्ही माफिया’म्हणत तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार केला होता. कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. यानंतर कंगनाच्या या टीकेला करणनेही तिच्याच शब्दात उत्तर दिले होते. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या पीडित व्यक्तीसारखे सादर करू शकत नाही.जणू काही बॉलिवूडमध्ये तुमच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत. बॉलिवूड इतके वाईट असेल तर सोडून द्यावे, असे म्हणाला होता. त्याचा इशारा अर्थातच कंगनाकडे होता.
प्रभास
२००८ मध्ये कंगनाचा ‘फॅशन’ हा सिनेमा हिट झाल्यानंतर तिचा एक तेलगू चित्रपट रिलीज झाला होता. ‘एक निरंजन’ असे या चित्रपटाचे नाव होते. यात कंगनाचा हिरो होता, ‘बाहुबली’ प्रभास. अर्थात त्यावेळी ना कंगना ‘क्वीन’ होती, ना प्रभास ‘बाहुबली’ होता. एका मुलाखतीत कंगनाने या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा शेअर केला होता. या चित्रपटाच्या सेटवर प्रभास अन माझे इतके मोठे भांडण झाले होते की, आम्ही एकमेकांशी बोलणे सोडून दिले होते, असे तिने सांगितले होते.
शाहिद कपूर
शाहिद व कंगना हे दोघे ‘रंगून’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने शाहिदला डिवचले होते. सेटवर शाहिदचे मूड नेहमीच खराब असायचा. तो मला सुसाईड बॉम्बरसारखा वागवायचा, असे कंगना म्हणाली होती. यानंतर शाहिदनेही कंगनाला तिच्याच शब्दांत उत्तर दिले होते. मला कंगनाच्या बोलण्याने फरक पडत नाही. प्रत्येकाशी वाद उखरून काढणाºया कंगनाची एखाद्या को-स्टारशी तरी मैत्री व्हावी, अशी मी प्रार्थना करतो, असे तो म्हणाला होता.
अजय देवगण
२०११ मध्ये आलेल्या ‘रास्कल’च्या शूटींगदरम्यान कंगनाचे अजय देवगण व संजय दत्तशी वाजल्याची खबर आली होती. कंगना स्वत:ला सुपरस्टारचा तोरा दाखवू लागली आहे, असे संजय म्हणाला होता. त्याकाळात अजय देवगण व कंगनाच्या अफेअरच्याही बातम्या होत्या. पण एका मुलाखतीत कंगना अजयबद्दल असे काही बोलली की, अजयच नाही तर संजय दत्तही नाराज झाला होता. यानंतर त्यांनी कंगनाला चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चलाही बोलवले नव्हते.
अध्ययन सुमन
शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन आणि कंगना एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये हृतिक व कंगनाचा वाद चर्चेत असताना अध्ययनने कंगनावर विचित्र आरोप केले होते. कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती आल्यादिवशी मला मारहाण करायची. घाणेरड्या शिव्या द्यायची. काळी जादू करायची. रक्त पाजायची, असे आरोप त्याने केले होते.
अपूर्व असरानी
कंगनाचा ‘सिमरन’ हा चित्रपट चर्चेत आला होता तो, कंगना व अपूर्व असरानी यांच्यातील मतभेदांमुळे. आता हा अपूर्व असरानी कोण? तर ‘सिमरन’चा पटकथालेखक. या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व भलताच संतापला होता.
‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत कंगना एका पत्रकारासोबत जोरदार भांडली होती. पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनी पत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला होता. पण प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव तिला सांगितले होते/ त्यांचे नाव ऐकून कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला होता.