आपल्या विशिष्ट आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या उषा उत्थुप यांची हरे राम हरे कृष्ण, रम्बा हो.. सांबा हो.. व ‘ हरी ओम् हरी ’ ही गाजलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्या 1969 सालापासून गात असून त्यांना या क्षेत्रात 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. उषा उत्थुप यांनी कॅब्रेमध्ये गाणी गाऊन त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांना महिन्याला फक्त 750 रुपये मानधन मिळत असल्याचे त्यांनी इंडिया म्युझिक समीट 2018मध्ये सांगितले.
इंडिया म्युझिक समीट 2018ला आज जयपूरमध्ये सुरूवात झाली असून रविवारी या समीटची सांगता होणार आहे. या समीटच्या उद्घाटनानंतर उषा उत्थुप यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गायन कारकीर्दीबद्दल सांगितले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, जेव्हा मी कॅब्रेमध्ये गात होते, त्यावेळी मला महिन्याला फक्त 750 रुपये मिळत होते. त्या पैशांनी माझे काहीच झाले नाही. मात्र आता गायक अरजित सिंग, श्रेया घोषाल यांच्यासारखे आघाडीचे गायक एका शोचे एक ते तीन कोटी रुपये मानधन घेतात. त्यांना हे करता आले खरेच ही खूप चांगली गोष्ट आहे. मला जे मिळाले त्यात मी खूश आहे. माझ्यासाठी रसिक महत्त्वाचे आहेत. पाच प्रेक्षक असतील तरी मला चालतात. जेव्हा कोणीच गायला सांगत नाही तेव्हा खूप वाईट वाटते. मात्र इथे येऊन मी खूप खूश आहे कारण इथले रसिक मला गाणे गाण्यासाठी सांगत आहेत. यावेळी बोलत असताना उषा उत्थुप यांनी खंतदेखील व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, दम मारो दम हे अतिशय गाजलेले गाणे आपल्याला मिळाले होते. त्यासाठी आपण पूर्ण तयारी केली होती, त्याची रंगीत तालीमही झाली. मात्र, ऐनवेळी ते गाणे माझ्याऐवजी आशा भोसलेंनी गायले. याविषयी मी ‘पंचम’दाकडे विचारणा केली, तेव्हा ते गाणे गेले, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ते गाणे माझे होते. मात्र, ऐनवेळी ते माझ्याकडून आशाकडे गेले. अशाप्रकारे माझ्याकडील अनेक गाणी अन्यत्र गेली. मात्र, जी गाणी मिळाली, त्यातही आपल्याला समाधान आहे. ज्याप्रमाणे दाणे-दाणे पे खाने वाले का नाम लिखा होता है, असे म्हटले जाते. त्याच पद्धतीने गाणे गाणे पे गाणेवाले का नाम लिखा होता है, यावर आपला विश्वास आहे.