कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात आला असला तरी सोनूकडून लोकांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. सोशल मीडियावर जे कुणी सोनूला मदत मागतात तो लगेच त्यांना मदतीची व्यवस्था करतो. सोनच्या या कामाने त्याची लोकप्रियता आणखी जास्त वाढली आहे. अशात अशी चर्चा सुरू आहे की, लवकरच सोनू सूदचा बायोपिक येऊ शकतो.
असं असलं तरी बायोपिकबाबत सोनू सूदचे विचार वेगळे आहेत. स्पॉटबॉयसोबत बोलताना सोनू म्हणाला की, मला वाटतं की, माझ्यावर बायोपिक बनवला जाऊ नये. सोनू म्हणाला की, त्याच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची ही घाई होईल. तो म्हणाला की, त्याला आयुष्यात अजून खूप काही मिळवायचं आहे. त्याने हेही मान्य केलं की, काही निर्मात्यांनी त्याच्या बायोपिकसाठी संपर्क केला होता.
जेव्हा सोनूला विचारण्यात आले की, जर त्याचा बायोपिक बनला तर त्याची भूमिका कुणी साकारावी असं त्याला वाटतं? यावर सोनू म्हणाला की, त्याला स्वत:ला स्वत:ची भूमिका करणं आवडेल. तो म्हणाला की, त्याने स्वत: हा अधिकार कमावला आहे. तो हेही म्हणाला की, त्याचा बायोपिक बनलाच तर याच अटीवर बनेल की, तोच त्याची भूमिका साकारेल.
दरम्यान, सोनू सूदने अनेक भाषांमधील सिनेमात काम केलं आहे. करतो आहे. सोनू सूदने १९९९ मध्ये एक तमिळ सिनेमातून डेब्यू केलं होतं. हिंदी सिनेमात त्याने २००२ मध्ये आलेल्या 'शहीद ए आझम' मध्ये भगत सिंह यांची भूमिका साकारत डेब्यू केलं होतं. तो शेवटचा 'सिंबा' सिनेमात व्हिलनची भूमिका करताना दिसला होता. आता सोनू आगामी 'पृथ्वीराज' सिनेमात दिसणार आहे. यात अक्षय कुमारची मुख्य भूमिका आहे. तसेच माझी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.