प्रदीर्घ कायदेशीर कारवाईनंतर सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे आणि मृत्यूचे कारणे शोधण्यासाठी सीबीआयने एम्सच्या तज्ज्ञ समितीची फॉरेन्सिक टीम तयार केली होती. या फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम सुशांतच्या व्हिसेराचीही तपासणी करत आहेत. एम्सच्या फॉरेन्सिक टीमची आणि सीबीआय यांची बैठक महत्त्वाची मानली जाते आहे.
एम्सच्या फॉरेन्सिक टीमने केली चौकशी एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली. मुंबईत येऊन या टीमने सुशांतचे पोस्टमॉर्टम करणार्या डॉक्टरांच्या टीमची चौकशी केली. या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या घरी जाऊन तीन दिवस चौकशी केली होती. 3 वेळा क्राईम सीनला रिक्रिएट केले.
व्हिसेरा रिपोर्ट सोपवणार सीबीआयला एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता सुशांत सिंग राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट पुढच्या आठवड्यात सीबीआयला देणार आहेत. ते म्हणाले की आधी मेडिकल बोर्डाची बैठक होईल आणि त्यानंतरच ही टीम सीबीआय टीमला काही सूचना देईल. या व्हिसेराची फॉरेन्सिक तपासणी केल्याने हे सिद्ध होईल की सुशांतने आत्महत्या केली किंवा त्यामागे काही कट रचले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक गुरुवारी होणार असून सीबीआयचे पथक मुंबईहून एक दिवस आधी दिल्लीत दाखल झाले आहे.
सुशांतची हत्या विष देऊन केली होती का? त्याच्या मानेवर असलेल्या खुणा कसल्या ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांनाची उत्तर आजच्या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला तीन महिने झाले आहेत. 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये तो मृत अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या आधारे सांगितले होते की, सुशांतचा मृत्यू गळफासामुळे गुदमरल्यामुळे झाला. परंतु बर्याच लोकांनी या अहवालाबद्दल शंका उपस्थित केली. सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर दिल्लीच्या एम्स रुग्णालयाची टीम त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहे.