हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांकडे एकाहून एक बड्या बॅनर्सचे सिनेमा असतात. या कलाकारांकडे दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. तर काही कलाकारांचा संघर्ष काही संपता संपत नाही. कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील. कलाकारांच्या या दोन प्रकारांसह आणखी एका विशेष आणि हटके स्टाईलचेही कलाकार असतात. जे कसला मागचा पुढचा विचार न करता सिनेमा नाकारतात. तत्त्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड या कलाकारांना मान्य नसते. अशाच मोजक्या आणि निवडक कलाकारांमध्ये अभिनेता सुदेश बेरी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सुदेश बेरी यांनी एक दोन नाही तर तब्बल २०० सिनेमांच्या ऑफर्स धुडकावून लावल्यात. हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या 'डर' या सिनेमातील किंग खान शाहरुखची भूमिका सुदेश बेरी यांना ऑफर करण्यात आली होती. मात्र ही भूमिका सुदेश बेरी यांनी नाकारली. गर्लफ्रेंड्स आणि काम केलेले सिनेमा यांची आकडेवारी ठेवण्यात काहीच रस नाही असे सुदेश यांनी म्हटले होते.
आपल्या समकालीन कलाकारांनी २५ ते ३० वर्षांत ३०० सिनेमा केले असतील तर किमान तेवढेच सिनेमा आपण नाकारले असतील असं सुदेश यांनी म्हटलं होतं. आजोबांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कधीही पैसा, मोह आणि माया या मागे लागलो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सुदेश यांनी बॉक्सर बनावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र एका अपघातानंतर सुदेश यांना बॉक्सिंग सोडावी लागली. सुदेश यांनी आपला लेक सूरजवर करिअरबाबत कधीच दबाव टाकला नाही. त्याला जीवनात काय करायचंय यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचं सुदेश यांनी सांगितले होते.