करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) हा चॅट शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. गुरूवारी टेलिकास्ट झालेल्या या चॅट शोच्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) व साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु सहभागी झाले होते. यादरम्यान करण, अक्षय व सामंथाने धम्माल केली. याच शोमध्ये अनेक खुलासेही झालेत. अक्षयने यावेळी एक मोठा खुलासा केला. 2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘जानी दुश्मन- एक अनोखी कहानी’ या चित्रपटामुळे मी मुंबईत घर खरेदी केलं, असं अक्षयने सांगितलं. खास बात म्हणजे, हे सगळं सनी देओलमुळे (Sunny Deol) शक्य झालं. आता अक्षयचं घर आणि सनी देओलचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आहे...
अक्षय म्हणाला...मी पैसा कमावण्यासाठी इंडस्ट्रीत आलो होतो. माझा फोकस एकदम क्लीअर होता. मी इथे आलो तेव्हा मी 5 हजार रूपये कमवत होतो. पण एकदिवस मला जाहिरात मिळाली आणि या जाहिरातीसाठी 2 तास काम करण्याचे 21 हजार मिळाले. कोण कुणाचा मुलगा आहे, मला काम मिळणार की नाही, याचा मी कधीच विचार केला नाही. एखादा प्रोजेक्ट आवडला तर तो करायला हवा. मग त्यात तीन हिरो आहेत की चार, असा विचार करायची गरज नाही. मी ‘जानी दुश्मन’ केला, त्यात एक-दोन नाही तर सात हिरो होते.
मी दिवसाच्या हिशेबाने पैसे घेत होतो. विलेन मी साकारत असलेल्या पात्राला मारून टाकतो, असा या चित्रपटात एक सीन होता. तो सीन झाला आणि यानंतर उद्या कामावर याचचं की नाही, असा प्रश्न मला पडला. मी दिग्दर्शकाला विचारायला गेलो. यावर तुझं पात्र अद्याप कोमात आहे, असं दिग्दर्शकाने मला सांगितलं. कारण माझं कॅरेक्टर मेल्यानंतर नवा अॅक्टर येणार होता. पण तो न्यूयॉर्कमध्ये अडकून पडला होता. त्यामुळे मी आणखी पाच दिवस काम केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आज मी ज्या घरात राहतोय, ते घर खरेदी करण्यासाठी मला पैशांची गरज होती आणि जानी दुश्मनमुळे मी ते घर खरेदी करू शकलो.
आता तो न्यूयॉर्कमध्ये अडकून पडलेला अॅक्टर कोण होता? तर तो सनी देओल होता. त्याच्या पाठीशी सर्जरी झाली होती आणि त्यामुळे तो शूटींगसाठी येऊ शकला नव्हता. एकंदर काय तर अक्षयने मुंबईत स्वत:चं घर घेतलं, त्यात सनी देओलचाही अप्रत्यक्ष वाटा होता...!!