बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या ८व्या सीझनला प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. नुकतंच या शोमध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी या बॉलिवूडच्या दोन स्टार्सने हजेरी लावली. 'कॉफी विथ करण'मध्ये अजय आणि रोहितने करणच्या प्रश्नांना मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली. या शोमध्ये अजयने लेक निसाच्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं.
अजय देवगणची लेक निसादेखील लोकप्रिय स्टारकिड आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये निसा दिसून येते. निसाचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर अनेकदा निसाला ट्रोलही केलं जातं. लेकीला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबाबत करणने अजय देवगणला कॉफी विथ करणमध्ये प्रश्न विचारला. "निसा जिकडे जाईल तिकडे पापाराझी तिच्या मागे असतात, याबाबत तुझं काय मत आहे", यावर उत्तर देताना अजय देवगणने ट्रोलिंगवरही भाष्य केलं. "मला हे आवडत नाही...आम्हाला हे आवडत नाही आणि तिलाही या गोष्टी आवडत नाहीत," असं अजय देवगण म्हणला.
पुढे तो म्हणाला, "पण, तुम्ही हे बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर प्रेम करता. काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात याचा अर्थ सगळेच तुमच्याबद्दल तोच विचार करतात असं नाही. त्यामुळे या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. तुम्ही चांगल्या गोष्टींबद्दल पोस्ट करता पण कोणीही ते वाचत नाही. सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करत नसूनही ते स्वत:ला स्टार समजतात."