बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान अभिनयापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. करियर यशाच्या शिखरावर असताना सैफने वयाने १० वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगबरोबर लग्नगाठ बांधत संसार थाटला. १३ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हा सैफ-अमृता यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं होती. सैफ आणि अमृताच्या वेगळं होण्याच्या निर्णयानंतर घरच्यांना जबर धक्का बसला होता. 'कॉफी विथ करण'मध्ये पहिल्यांदाच शर्मिला टागोर यांनी सैफ आणि अमृताच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं.
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये सैफ अली खानने आई आणि लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासह हजेरी लावली होती. कॉफी विथ करणमध्ये सैफने त्याचं पहिलं लग्न आणि घटस्फोटाबाबत भाष्य केलं. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नाला शर्मिला टागोर यांचा विरोध होता. सैफने अमृता यांच्याशी लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 'कॉफी विथ करण'मध्ये सैफने याचा खुलासा केला. तर अमृताबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय सैफने सगळ्यात आधी शर्मिला यांना सांगितला होता. त्यावेळी शर्मिला यांनी तुझ्याबरोबर असल्याचं सैफला सांगितलं होतं.
कॉफी विथ करणमध्ये त्या म्हणाल्या, "मुलांनी पालकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणं ही चांगली गोष्ट आहे. पण, जेव्हा तुम्ही इतक्या वर्षांसाठी एकत्र असता आणि तुम्हाला दोन गोंडस मुलं असतात. तेव्हा ब्रेकअप ही गोष्ट सोपी नसते. अशावेळी सामंजस्य दाखवून सुसंवाद साधणं कठीण असतं. कारण, तेव्हा सगळेच दुखावलेले असतात. त्यामुळे तेव्हा ही गोष्ट सोपी नव्हती. पण, मी प्रयत्न केले. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही." कुटुंबीयांसाठीही ती चांगली वेळी नव्हती, असंही शर्मिला म्हणाल्या. कारण, फक्त अमृताच नव्हे तर कुटुंबाने सारा आणि इब्राहिमलाही गमावलं होतं.
सैफ अली खान आणि अमृता सिंगने १९९१ मध्ये लग्न केलं होतं. २००४मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर सैफने २०१२मध्ये करीना कपूरबरोबर लग्न केलं. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत.