अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिला कोणत्याच परिचयाची गरज नाहीय. कोंकणा ३ नोव्हेंबरला आपला ४३ व्या वाढदिवस साजरा करणार आहे. कोंकणाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोंकणाने कोलकात्याच्या इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर सेंट स्टिफन कॉलेजात ती शिकली. आज कोंकणाबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
कोंकणाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. १९८३ मध्ये ‘इंदिरा’ या बंगाली चित्रपटात ती बालकलाकार म्हणून झळकली होती. कोंकणा सेनचे वडील मुकुल शर्मा सुप्रसिद्ध पत्रकार आहेत तर आई अपर्णा सेन एक नामांकित दिग्दर्शिका. कोंकणा आपल्या आई-वडिल दोघांचेही सरनेम आपल्या नावापुढे लावते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘एक जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून कोंकणाला लीड भूमिका मिळाली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि कोंकणा हिट झाली.
२००२ मध्ये कोंकणाने सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्या ‘तितली’मध्ये भूमिका साकारली. यात कोंकणाची आई अपर्णा सेन आणि मिथुन चक्रवर्तीही होते.
२००५ मध्ये कोंकणाने मधूर भांडारकर यांच्या ‘पेज 3’ या हिंदी चित्रपटात लीड भूमिका साकारली. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. कोंकणाने आई अपर्णाने दिग्दर्शित केलेल्या ‘मि. अॅण्ड मिसेस अय्यर’ या इंग्रजी सिनेमात देखील तिने काम केले. याकरता तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘अकिरा’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटातही ती दिसली.