Join us

Mahesh Babu Father Krishna Death: भल्याभल्यांना मोडता आला नाही महेशबाबूच्या वडिलांचा ‘तो’ रेकॉर्ड...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 3:14 PM

Mahesh Babu Father Krishna Death: तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार शिवा राम कृष्णा घट्टामनेनी यांचं आज मंगळवारी निधन झालं. त्यांना कृष्णा या नावानंही ओळखलं जायचं.

Mahesh Babu Father Krishna Death: तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि महेश बाबूचे (Mahesh Babu) वडील शिवा राम कृष्णा घट्टामनेनी (Krishna ) यांचं आज मंगळवारी निधन झालं. त्यांना कृष्णा या नावानंही ओळखलं जायचं. त्यांची दुसरी ओळख सांगायची झाल्यास ते सुपरस्टार महेशबाबूचे वडील. सोमवारी मध्यरात्री कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना लगेच हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यात बुरीपलेम येथे त्यांचा जन्म झाला होता.  1960 दशकाच्या सुरुवातीला त्यांनी छोट्या भूमिका साकारत तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 1965 मध्ये त्यांनी दिग्दर्शक अदुर्थी सुब्बा राव यांच्या ‘थिने मनसुलू’ या चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. हा सिनेमा रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. यानंतर कृष्णा यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. अभिनयाशी त्यांच्या कुटुंबीयांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पण कृष्णा यांना अभिनयात रूची होती. हिरो बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. व्ही मधुसूदन राव यांनी कृष्णा यांना पहिली संधी दिली. मात्र अदुर्थी सुब्बा राव यांनी त्यांचं नशीबच बदलवून टाकलं.

कृष्णा यांनी 60,70 व 80 च्या दशकात तेलगू इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिलेत. त्याकाळातील सर्वाधिक हँडसम हिरोंमध्ये त्यांची गणना होत असे. तेलगू सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारे आणि सर्वाधिक महागडे अभिनेते म्हणून ते ओळखले जात. अगदी त्यांना साईन करायचं म्हटलं की, निर्मात्यांना अनेक महिन्यांआधी त्यांच्या डेट्स घ्याव्या लागायच्या. 5 दशकांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 350 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं.  एका वर्षात ते सर्वसाधारणपणे 10 चित्रपट करायचे. 1970 मध्ये त्यांनी 16 चित्रपटांमध्ये तर 1972 मध्ये त्यांनी 18 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. अ‍ॅक्टिंग करिअर शिखरावर असताना त्यांनी पदमाल्य फिल्म्स स्टुडिओ नावाने स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं.

रचले अनेक विक्रमकृष्णा यांनी  तेलुगू चित्रपटात नवनवीन प्रयोगसुद्धा केले. सिनेमॅटिक कल्पना, थीम, तंत्रज्ञान आणि व्हिज्युअल स्टाइलच्या बाबतीत ते नेहमी काळाच्या पुढचा विचार करायचे.  कृष्णा यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला अत्याधुनिक चित्रपट-निर्मिती तंत्रज्ञानाची ओळख करून दिली होती. त्यांचा ‘अल्लुरी सीताराम राजू’ हा पहिला असा तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट होता, जो सिनेमास्कोपमध्ये चित्रित झाला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘सिंहासनम’ हा 70 मिमी फिल्मवर बनला होता. त्यांच्या करिअरमधील 200 वा चित्रपट ‘इनाडू’ हा पहिला ईस्टमन कलरमधील चित्रपट होता. त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. ते साऊथचे एकमेव अभिनेते आहेत, ज्यांनी एकाच अभिनेत्रीसोबत डझनांवर सिनेमे केलेत. विजय निर्मलासोबत त्यांनी 48 चित्रपटांत काम केलं होतं. तर जयाप्रदा यांच्यासोबत 47 सिनेमांत ते झळकले होते.

चित्रपटात एकत्र काम करता करता कृष्णा विजय निर्मलाच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ते विवाहित होते. पहिली पत्नी इंदिरा देवीला घटस्फोट देऊन त्यांनी विजय निर्मलांसोबत दुसरा संसार थाटला. महेश बाबू हा इंदिरा देवी वकृष्णा यांचा मुलगा आहे. दोन महिन्यांआधीच कृष्णा यांची पहिली पत्नी व महेशबाबूची आई इंदिरादेवी यांचं निधन झालं होतं.

टॅग्स :महेश बाबूTollywood