बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
कृष्णा राज कपूर दीर्घकाळापासून आजारी होत्या. आज सोमवारी पहाटे त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली.
बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी ऋषी कपूर यांच्या घरी येत कृष्णा राज कपूर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कपूर कुुटुंबासोबतचं अनिल कपूर, काजोल,संजय दत्त, जितेन्द्र, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, राकेश रोशन, शर्मिला टागोर, राणी मुखर्जी असे अनेक जणांनी कृष्णा राज कपूर यांचे अंत्यदर्शन घेतले.
यानंतर कृष्णा राज कपूर यांच्यावर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृष्णा यांची दोन्ही मुले रणधीर आणि राजीव हजर होते. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला गेले असल्याने ते आपल्या आईच्या अंत्ययात्रेत सामील होऊ शकले नाहीत. रणबीर कपूर आणि नीतू कपूर हेही अमेरिकेत असल्याने हे दोघेही यावेळी हजर नव्हते.
कृष्णा यांना गत आॅगस्टमध्ये मुंबईस्थित एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली होती. कृष्णा यांना पाच मुले. यात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा व रितू यांचा समावेश आहे.
करिना कपूर, करिश्मा कपूर , रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर यांच्या त्या आजी होत. ८७ वर्षांच्या वयातही कृष्णा ब-याच अॅक्टिव्ह होत्या. फॅमिली पार्टी आणि अनेक चित्रपटाच्या प्रीमिअरला त्या हजेरी लावत. १९८८ मध्ये राज कपूर यांचे निधन झाले. यानंतर कृष्णा यांनीच संपूर्ण घराला आधार दिला.