Join us

कंगना, गोविंदानंतर आता क्रिती सनॉनचाही राजकारणात प्रवेश? म्हणाली, "मी जे करते ते..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 9:19 AM

अभिनेत्री क्रिती सनॉनही राजकारणात एन्ट्री घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

सध्या सगळीकडे राजकीय वातावरण आहे. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. त्यातच मनोरंजनसृष्टीतही राजकारणाचं वारं आहे. कंगना रणौतला भाजपकडून थेट लोकसभेचं तिकीटच मिळालं. तर काल अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यानंतर आता अभिनेत्री क्रिती सनॉनही (Kriti Sanon) राजकारणात एन्ट्री घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

क्रिती सनॉनचा 'क्रू' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाच्या निमित्ताने आयोजित एका इव्हेंटमध्ये क्रितीला तिच्या राजकीय प्रवेशाच्या इच्छेबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, "मी अद्याप याबाबत विचार केला नाही. मी हे करेन किंवा ते करेन असा विचार करत नाही जोवर मला मनातून वाटत नाही. तसंच जोवर मला त्याबद्दल काही पॅशनेट वाटत नाही तोवर मी त्याबद्दल विचार करत नाही. जर एखाद्या दिवशी मला वाटलं की मी आणखी काहीतरी करायचं आहे तर तेव्हा कदाचित मी राजकारणाचाही विचार करु शकते. पण सध्या तसं काहीच नाही."

ती पुढे म्हणाली, "माणसाने वेळोवेळी गिअर बदलले पाहिजेत आणि आयुष्यात आधी जे केलं नाही ते करण्यासाठी स्वत:ला आव्हान दिलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या मनातून आवाज येत नाही तोवर मात्र तुम्ही त्या वाट्याला न गेलेलंच बरं."

सध्या लोकसभा निवडणूकीत कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून उभी राहिली आहे. तर रामायण मालिकेतील राम म्हणजेच अभिनेते अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. कालच पुन्हा राजकारणात आलेला गोविंदा निवडणूक लढवणार का याविषयी अजून स्पष्ट व्हायचं आहे.

टॅग्स :क्रिती सनॉनराजकारणबॉलिवूडनिवडणूक