एकीकडे संपूर्ण देश इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनामुळे शोकमग्न आहे आणि दुसरीकडे स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा समीक्षक म्हणवणारा केआरके अर्थात कमाल राशीद खानचे बरळणे सुरु आहे. होय, कायम वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणा-या केआरकेने इरफान व ऋषी कपूर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले आणि लोकांचा संताप अनावर झाला. यानंतर युजर्सनी केआरकेचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड करण्याची मागणी लावून धरली. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच केआरकेने ट्विट डिलीट केले़. पण तोपर्यंत सोशल मीडिया युजर्सनी त्याला अक्षरश: झोडपून काढले.
इरफान खानच्या निधनाने चाहते दु:खात असतानाच अचानक ऋषी कपूर रूग्णालयात भरती असल्याची बातमी आली होती. या बातमीने सगळ्यांची चिंता वाढवली असतानाच केआरकेने ट्विट केले. ‘ऋषी कपूर एचएन रिलायन्स रूग्णालयात भरती आहेत आणि मला त्यांना काही सांगायचे आहे. सर, बरे होऊनच परत या़ निघून जाऊ नका. कारण दारूची दुकाने आता केवळ 2-3 दिवसांतच खुलणार आहेत,’ असे ट्विट त्याने केले. 29 एप्रिलला मध्यरात्री 12 वाजून 34 मिनिटाला त्याने हे ट्विट केले होते. (30 एप्रिलला सकाळी पावणे नऊच्या सुमारास ऋषी कपूर यांचे निधन झाले.) त्याच्या या ट्विटनंतर नेटक-यांनी केआरकेला चांगलेच फैलावर घेतले. केआरके कायम त्याच्या नको त्या ट्विटमुळे चर्चेत राहतो. बॉलिवूड स्टार्सवर अनेक वादग्रस्त ट्विट लिहून यापूर्वी त्याने वाद ओढवून घेतले आहेत. यासाठी तो अनेकदा ट्रोलही झाला आहे.
मला माहितीये पुढचा नंबर कोणाचा?या ट्विटआधी केआरकेने आणखी एक ट्विट केले होते. ‘कोरोना काही दिग्गजांना घेतल्याशिवाय जाणार नाही, असे मी काही दिवसांपूर्वीच म्हणालो होतो. मी त्या व्यक्तिंची नावे लिहिली नव्हती कारण मग लोक मला शिव्या घालायला लागतात. पण इरफान खान व ऋषी कपूर जाणार, हे मला माहित होते. यानंतर पुढचा नंबर कोणाचा, हेही मला ठाऊक आहे,’ असे त्याने या ट्विटमध्ये लिहिले होते.